रोखठोक – मुंढे नावाचा नवा शेषन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुकाराम मुंढे यांनी ‘एफडीए’ आयुक्त म्हणून सुरू केलेली कामगिरी धडाकेबाज आहे. जनता आतापर्यंत विष प्राशन करत होती हे त्यांच्या धाडसत्रातून दिसते. मुंढे यांना त्यांची कर्तबगारी दाखवण्याची संधी इतर क्षेत्रांतही मिळायला हवी. मुंढे यांच्या धडाक्याने मला टी. एन. शेषन यांची आठवण झाली!

तुकाराम मुंढे यांनी जनतेला स्वच्छ, भेसळमुक्त अन्न वगैरे देण्याचा विडा उचलला आहे. हॉटेल्स, पेट्रोल पंप, मेस, मिठाईच्या दुकानांवर त्यांनी घातलेल्या धाडी लक्षवेधी ठरत आहेत. मुंढे यांचा रणगाडा सुसाट सुटला आहे. महाराष्ट्रात आपण सर्व अशुद्ध पाणी, भेसळयुक्त अन्न पचवत आतापर्यंत कसेबसे जगलो याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत. तुकाराम मुंढे यांच्या धाडी सुरू असतानाच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची प्रकृती बिघडली व त्यांना इस्पितळात दाखल केले. शहा यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निदान झाले व ते एकदम गलितगात्र झाले. शहा यांना कोणत्या अन्नातून विषबाधा झाली? त्यांनी ते अन्न कोठे खाल्ले? या तपासाची जबाबदारी मुंढेंवर सोपवायला हवी. मुंढे यांनी हायकोर्टाच्या कॅण्टीनवर धाड घातली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ‘पंचतारांकित’ खाणावळीत उंदीर फिरत असल्याचे कळले म्हणून तेथे धाड टाकून ती खाणावळ बंद केली. एमसीए मुंढेंविरुद्ध हायकोर्टात गेली व कोर्टाने मुंढे यांना झापले. मुंढे कोणालाच सोडत नाहीत. संपूर्ण जग, समाज, व्यवस्था, प्रशासन भ्रष्ट आहे. ती सफाई करण्याची जबाबदारी ईश्वराने आपल्यावरच सोपवली असल्याचे ते मानतात. फडणवीस यांचे हिंदुत्ववादी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, मुंढे फक्त हिंदूंच्याच दुकानांवर धाडी घालतात. मुस्लिम मोहल्ल्यांत धाडी घालून दाखवा. मुंढे यांनी लगेच सुलेमान मिठाईवाल्यावर धाड घालून त्यांचा मिठाई विक्रीचा परवानाच रद्द केला. मुंढे थांबत नसतात. ते धाडी घालत धावत सुटतात. उपनगरातल्या पंचतारांकित हाटेलमध्ये एक प्रख्यात डॉक्टर आपल्या मित्रांसह जेवायला गेले. जेवणाची ऑर्डर दिली. तोपर्यंत प्लेटस् वगैरे मांडल्या. प्लेटच्या आसपास एक झुरळाचे पिल्लू फिरताना डॉक्टरांनी पाहिले. डॉक्टरांना ‘मुंढे’ आठवले. त्यांनी त्या झुरळाचा फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकला. लगेच मुंढे यांचे धाड पथक त्या हॉटेलात उलथापालथ घडवायला धडकले. एफडीएने सध्या महाराष्ट्रात अशी धमाल माजवली आहे. मुंढे यांचे फोटो झळकत आहेत. चॅनल्सवर मुलाखतींचे कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळात होरपळलेला शेतकरी मदतीसाठी याचना आणि आक्रोश करीत आहे त्याप्रमाणे मुंढे यांनी बंद केलेल्या हॉटेल्स, दुकानांतील बेरोजगार स्टाफही सरकारकडे मदतीसाठी याचना करीत आहे!

भेसळीचा मार्ग

महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होते. सगळ्यात जास्त भेसळ दुधात व दुधापासून बनवलेल्या पदार्थांत होते. दूध मलईदार, शुभ्र दिसावे म्हणून त्यात ‘युरिया’ मिसळले जाते. पनीर, खवा यांपासून बनवल्या जाणाऱ्या मिठाया म्हणजे ‘जहर’ ठरल्या आहेत. मिठाईवरील चांदीचा ‘वर्ख’ आरोग्यास धोकादायक आहे. हे सर्व बंद करून मुंढे यांनी जनतेवर उपकार केले आहेत. निवडणूक आयोगात टी. एन. शेषन यांनी ज्याप्रमाणे आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली त्याच पद्धतीने मुंढे यांनी एफडीएमध्ये असलेल्या नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली. मुंढे स्वतःचे असे काहीच करत नाहीत. ते फक्त नियम व कायद्याची अंमलबजावणी करीत आहेत, पण शेषन यांनी आचारसंहिता अंमलबजावणीचा अतिरेक केला. तीच शेषनगिरी मुंढे करत आहेत काय? सर्व काही बंद करून मुंढे काय साध्य करणार? मुंढे यांच्या खात्याचे मंत्री नरहर झिरवळ आहेत. इतक्या महत्त्वाच्या व संवेदनशील, जनहिताच्या खात्याची धुरा झिरवळांसारख्या मंत्र्यांना द्यावी हे अक्कलशून्यतेचे लक्षण आहे. अन्न-औषध प्रशासन खाते म्हणजे सर्वात मोठ्या खाऊबाजीचे कुरण असे ज्या मंत्र्यांना वाटले त्या मंत्र्यांची अवस्था मुंढे यांनी बिकट केली. धाडी घालून मांडवली करायची. गुटखा, तंबाखूच्या परराज्यांतून आलेल्या ट्रक्सकडून वसुली करायची व विष घालून माणसे मारायची हे सर्व मुंढे यांनी तूर्त तरी थांबवले आहे. अर्थात म्हणून राज्यातली भेसळ, भ्रष्टाचार थांबला असे होत नाही, पण भेसळ करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, हे नक्की. एखादे खाते अनियमिततेविरुद्ध कठोर पावले उचलते तेव्हा त्या खात्यातील भ्रष्टाचाराचा ‘रेट’ वाढतो. असे सांगितले जाते. एखादा नवा पोलीस अधिकारी आला की, आपल्या विभागातील दारू, मटके, जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी घालून ते बंद पाडतो, पण हे अड्डे कायमचे कधीच बंद पडत नाहीत. मुंढे यांच्याबाबतीत तसे म्हणणे हा अन्याय ठरेल, पण त्यांच्या धाड पथकांनी मांडलेला हैदोस दुर्लक्षित करण्यासारखा नाही. मुंढे यांनी औषधांचा, सलाईनचा काळाबाजार रोखला आहे. मोठे राकेट तूर्तास ‘थंड’ पाडले आहे हे खरेच, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढे यांना एकाच खात्यात मर्यादित ठेवू नये. त्यांच्या धडाकेबाज कार्याचा लाभ इतर क्षेत्रांनाही मिळू द्या. ते कसे?

व्याप्ती वाढवा

तुकाराम मुंढे यांच्यातला ‘शेषन’ जागा आहे तोपर्यंत फडणवीस यांनी त्यांचा योग्य वापर केला पाहिजे. महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रांत भ्रष्टाचार आणि बजबजपुरी माजली आहे. आर्थिक शिस्त बिघडली आहे. महाराष्ट्रावर ठिकठिकाणी बेमूर्वतखोर वतनदारांचे राज्य सुरू आहे. हे सर्व थांबवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका टास्क फोर्सची स्थापना करावी व त्याचे नेतृत्व तुकाराम मुंढेंकडे द्यावे. मुंढे यांच्या शरीरातला सचोटीचा अग्नी अशा पद्धतीने बाहेर पडू द्या. फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांच्यासारखे पाच अधिकारी प्रशासनातून निवडायला हवेत. (पण असे पाच मोती मिळतील काय?) नगरविकास, महसूल, शक्तिपीठ मार्ग, शालेय पोषण आहार, आदिवासी विकास मंत्रालय, सहकारातील घोटाळे व ओरबाडणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘मुंढे टास्क फोर्स’ निर्माण झाला तर महाराष्ट्राची प्रतिमा सुधारेल. मुंढे हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातल्या भ्रष्ट नेटवर्कवरच धाडी घालतील. त्यानंतर भाजपचे लोक, जे आज मुंढे यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत, तेच ओरडू लागतील, “मुंढे देशद्रोही आहेत. फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी मुंढे हे विरोधकांची सुपारी घेऊन काम करत आहेत.”

मुंढे नावाचा शेषन स्वतःच्या अंगावर येत नाही तोपर्यंत ते सगळ्यांनाच हवे असतात.

आज मुंढे हॉटेलवाले, वडापाववाले, मिठाईवाले, पनीरवाले यांच्यामागे लागले आहेत तोपर्यंत ठीक. आचारसंहितेचे पालन गरीबांनीच करायचे असते!

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]