सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवण्याचा प्रयत्न; पतीसह सासरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका 32 वर्षीय विवाहितेने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. महिलेने मांडवी येथील अलहमपार्क इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिचा पती, सासू-सासरे आणि दोन आत्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशना इम्रान सुवर्णदुर्गकर (32) असे गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. आशनाचा पती इम्रान याच्या घरातील नातेवाईकांचा इम्रान आणि आशनाच्या विवाहाला विरोध होता. या विरोधातूनच एप्रिल 2026 पासून 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत आशना हिला सासरच्या मंडळींकडून सतत त्रास दिला जात होता. “तू फुकट आली आहेस, माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आण, नाहीतर आमच्या मुलाचा दुसरा विवाह करून देऊ” असे टोमणे मारत तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.

सासरच्या मंडळींनी आशनाला घराबाहेर पडताना तिची पर्स चेक करणे, तिला कौटुंबिक कार्यक्रमांना बाहेर जाऊ न देणे, तिच्या दोन्ही लहान मुलांचा सांभाळ करू न देता मुलांना स्वतःकडे ठेवून आशना हिला एकटीलाच माहेरी पाठवून दिले जात होते. गेल्या आठ दिवसांपासून ती आपल्या मुलांची मागणी करत होती, मात्र सासरच्या मंडळींनी तिला मुले देण्यास नकार दिला होता.

या सर्व त्रासाला कंटाळून शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आशनाने आपला मोबाईल घरातच ठेवून राजीवडा येथील घर सोडले. त्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अलहमपार्क मांडवी, रत्नागिरी येथील अपार्टमेंटच्या ‘आय’ विंगच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेनंतर तिला तातडीने उपचारांसाठी चिंतामणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत तिच्या उजव्या हाताला, उजव्या पायाला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.

या प्रकरणी पती इम्रान खलील सुवर्णदुर्गकर, सासरे खलील सुवर्णदुर्गकर, सासू नसिरा सुवर्णदुर्गकर, पतीच्या आत्या सरवरी सुवर्णदुर्गकर आणि परवीन मुनाब सुवर्णदुर्गकर (सर्व रा. राजीवडा, रत्नागिरी) या पाच जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक संदेश चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.