
दिल्ली सरकारचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी तिलक नगर भागात एका निर्माणाधीन रस्त्याच्या पाहणीदरम्यान एका स्थानिक तरुणाच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी तीव्र संताप व्यक्त करत मंत्री प्रवेश वर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री प्रवेश वर्मा हे तिलक नगर परिसरात सुरू असलेल्या एका रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी आपचे स्थानिक आमदार जरनैल सिंग हे देखील घटनास्थळी आले आणि त्यांनी रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. याच दरम्यान रागाच्या भरात प्रवेश वर्मा यांचा तोल सुटला आणि त्यांनी जवळच उभ्या असलेल्या एका तरुणाला थेट कानशिलात मारली. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
या घटनेवर अरविंद केजरीवाल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, “मंत्र्याला अटक करा. मी उद्या तिथे जाणार आहे.” दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून आता वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाचे आमदार जरनैल सिंग हे विकासपुरी पोलीस ठाण्यात मंत्री प्रवेश वर्मा यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.























































