“देशद्रोही ज्ञानेश कुमार भाजपच्या हातातील ‘बाहुले’, बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही…”, रोहित पवार यांचा निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांत 6.5 लाख मतदार वाढले, मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता विधानसभा निवडणुकीत केवळ एका महिन्यात 6.5 लाख मतदार वाढविण्यात आले. हे मतदार कुठून आले आणि कसे आले? लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत तब्बल 71 लाख मतदान अधिक झाले असून, या संपूर्ण प्रकारात ईव्हीएम मॅनेज केले जात असल्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा नेते रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.

आम्ही पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेतले होते; मात्र ज्ञानेश कुमार स्वतःला राजा समजतात. आयोग यांच्या बापाचे आहे का? आमचे अनेक उमेदवार पिपाणीमुळे पडले. आम्ही अनेक वेळा सांगूनही याकडे लक्ष देण्यात आले नाही. मतदानाची आकडेवारी पाहिली तर एक लॉजिक लावून, एका सीक्वेन्समध्ये निवडून आलेल्या आमदारांची आकडेवारी आहे. पराभूत उमेदवारांची आकडेवारीही तशीच आहे. आम्ही आधार कार्ड कसे चुकीच्या पद्धतीने आणि फेक तयार केले जाते, याची माहिती दिली होती. शिरूर विधानसभा मतदारसंघात दुबार नावांची माहिती आहे. त्यात आम्ही शोध घेतला असता संबंधित माणसेच मिळाली नाहीत, असे रोहित पवार यांनी सांगितले.

आम्ही चोकलिंगम यांना भेटायला गेलो. ते फक्त गोड बोलतात; मात्र प्रत्यक्षात काम काहीही करत नाहीत. आपण पश्चिम बंगालमध्येही पाहिले, तिथेही तशीच परिस्थिती होती. बंगालमध्ये मतदार वगळून भाजप जिंकली, तसेच महाराष्ट्रात 2029 मध्ये करणार आहे. बंगालमधील 27 लाख मतदार अडकून ठेवले, त्यांना मतदान करता आले नाही. SIR वापरून तेथील जनता अडकवली, असे रोहित पवार यांनी सांगितले.

बिहारमध्येही हाच फॉर्म्युला वापरला गेला होता. महाराष्ट्रात एकूण 9.78 कोटी मतदार आहेत आणि आता 2.6 कोटी नावे वगळण्यात आली आहेत. खडकवासला मतदारसंघात 5,76,505 मतदार होते. एसआयआरमधून 2,77,851 मतदार वगळले; मात्र 2024 मध्ये 3,26,667 एवढे मतदान झाले होते. त्यामुळे येथे बाहेरून माणसे आणली गेली, त्यांच्याकडून मतदान करून घेतले गेले आणि आता त्यांची नावे वगळली जात आहेत. आता SIR झाले. आम्हाला सांगण्यात आले की, याद्यांचे शुद्धीकरण केले जाईल. परंतु आम्ही जी दुबार नावे मांडली होती, ती SIR नंतर पुन्हा आली आहेत, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना रोहित पवार यांनी प्रेझेंटेशन देऊन पोस्टल मतमोजणी आणि ईव्हीएम मतमोजणीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये किती फरक होता, ते दाखवून दिले. ईव्हीएम मॅनेज केल्याची जी चर्चा सुरू आहे, ती खरी असू शकते, असे वाटते. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जो मोर्चा निघणार आहे, त्यात ‘ईव्हीएम हटाओ’ हा सुद्धा एक मुद्दा घ्यावा, असे रोहित पवार म्हणाले. ज्ञानेश कुमार राजा म्हणून बसल्यावर निवडणूक आयोग आपल्या बापाचा असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे रोहित पवार म्हणाले. राज्यात जेव्हा लोकसभा निवडणूक झाली, तेव्हा वाढलेली मतदारांची संख्या कमी होती; पण विधानसभा निवडणुकीत मात्र पाच पटीने मतदारांची नावे वाढवण्यात आली, असा दावा रोहित पवार यांनी केला.

राज्याचे निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना आम्ही भेटलो आणि हे सर्व मुद्दे सांगितले; पण त्यांनी यावर काहीच केले नाही. राज्यात SIR मोहीम राबवली आहे. त्यात 2 कोटींहून अधिक मतदारांना वगळण्यात आले आहे, तर त्यांना नोटीस तरी देण्यात आली आहे का? आता या मोहिमेची वेळ का वाढवण्यात आली आहे? पश्चिम बंगालमध्ये देखील SIR करून विधानसभा निवडणूक भाजपला जिंकवण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने SIR प्रक्रिया राबविण्यात आली आहे आणि प्रत्येक पाचपैकी एक मतदार या प्रक्रियेत वगळण्यात आला आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

देशद्रोही ज्ञानेश कुमार भाजपच्या हातातील बाहुले आहेत, असा आरोप करत रोहित पवार यांनी भर पत्रकार परिषदेत भोसले आडनाव असलेल्या एका इसमाला थेट व्हिडिओ कॉल लावला. भोसले या जिवंत व्यक्तीला SIR यादीत मृत दाखवण्यात आल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच चिंचोली (कर्जत-जामखेड) येथील परशुराम लांडघुले या स्थानिक व्यक्तीलाही कायमस्वरूपी स्थलांतरित दाखवण्यात आल्याचा पुरावा त्यांनी माध्यमांसमोर मांडला.

निवडणुकीत अनामत रक्कम जप्त, तरीही 1870 कोटींची देणगी; गुजरातमध्ये राजकीय देणगी घोटाळा उघड, तीन पक्षांवर गुन्हे दाखल