Chhatrapati Sambhaji Nagar – कंटेनरमध्ये कार घुसली; चिमुकल्यासह आई-वडिलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुटीनिमित्त जालना येथील मूळगावी परतणाऱ्या दाम्पत्याच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. कंटेनर चालकाने अचानक लेन बदल केल्याने अपघातग्रस्त कार पाठीमागून घुसली, त्यात समोर बसलेले दोघे पती पत्नी तर पाठीमागील सीटवर बसलेल्या अवघ्या २ वर्षांच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता समृद्धी महामार्गावरील चॅनल क्र.४४९ जवळ झाला. हा अपघात समृद्धी महामार्गावरील बेशिस्त अवजड वाहनधारकांमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जालना शहरातील तलरेजानगर येथील मूळ रहिवासी असलेले प्रतीक रामकिसन जगदाळे (३१, ह.मु. कॉट नं १३०५, टॉवर १ सेक्टर ४४/१/११, ए-विंग, मुळशी, पुणे) येथे पत्नी श्रीया राजेंद्र पांडे (३२ श्रीया प्रतीक जगदाळे) व दोन वर्षांचा मुलगा रुद्रांश जगदळेसह राहतात. या आठवड्यात सुट्या लागून आल्याने ते मूळगावी जालना येथे कार (क्र. एमएच १२ वायएस १०२८) मधून येत होते. सकाळी साडेअकरा वाजता समृद्धी महामार्गाने जात असताना फतियाबाद परिसरात चॅनल गेट ४४९ परिसरात सूरतवरून सेलम जाणारा कंटेनर (क्र. जीजे २१वाय ३३६२) याला पाठीमागून कारने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कार कंटनेरच्या पाठीमागून संपूर्ण घुसली. कंटनेरचालक संगप्पा यमगर याच्या लक्षात येईपर्यंत जवळपास १०० ते २०० फूट कार फरफटत नेली. त्यामुळे कारच्या पहिल्या सीटवर असलेले दोघे पती-पत्नी व पाठीमागील सीटीवरील दोन वर्षांच्या मुलगा जागीच ठार झाले.

लेन कटिंगमुळे अपघात

समृद्धी महामार्गवर अवजड वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवीत असल्याच्या अनेक तक्रारी समृद्धी महामार्गाच्या कंट्रोलरूमकडे ऑनलाईन तसेच ऑफलाईन करण्यात आल्या आहे. मात्र, या तक्रारीकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने वाहनांच्या लेन कटिंगमुळे अनेक अपघात घडत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मोठा जागावाजा करून कॅमेरे लावून वाहनांना शिस्त लावण्याचा दावा करण्यात येतो. मात्र, या अपघाताने पुन्हा एकदा बेशिस्त वाहतुकीचे दर्शन घडले आहे.

तासाभरानंतर जखमींना बाहेर काढले

अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी पोलीस प्रशासनासह समृद्धीवरील सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. कार ही कंटेनरच्या खालच्या बाजूने घुसून अर्ध्याभागापर्यंत गेल्याने जखमींना बाहेर काढण्यासाठी जवळपास तास लागला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या तिघांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.