कल्याणमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे तातडीने नूतनीकरण करा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केडीएमसीने कल्याण येथील भगवा तलावाच्या काठावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारले आहे. शिवसेनाप्रमुखांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने स्मारकाचे अद्यायावत सुशोभिकरण आणि नूतनीकरण करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे ७ जानेवारी २०१७ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. स्मारकाच्या लोकार्पणाला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने त्याठिकाणी विविध दुरुस्ती, नूतनीकरण आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन बासरे यांनी आयुक्त गोयल यांना निवेदन दिले आहे. स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांना शिवसेनाप्रमुखांची भाषणे आणि त्यांचा जीवनपट ऐकण्यासाठी अद्ययावत हेडफोन उपलब्ध करून देणे आणि स्मारकातील संगीत यंत्रणा कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.

याकडे वेधले लक्ष
स्मारकातील संपूर्ण विद्युत व्यवस्था नव्याने करणे, मागील प्रवेशद्वाराच्या परिसरात नवीन लादी बसवणे, मुख्य प्रवेशद्वाराची दुरुस्ती, स्मारकाच्या संपूर्ण संरक्षक भिंतीला रंगकाम, शिवसेनाप्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याची डागडुजी, परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, वृक्षलागवड, स्वच्छतागृहांचे नूतनीकरण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुरक्षारक्षक केबिन, सीसीटीव्ही यंत्रणा, दूरदर्शन संच नव्याने बसविण्याची मागणी सचिन बासरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.