धावत्या दुरंतो एक्सप्रेसवर दगडफेक; एसी डब्याची काच फुटली, काचेचे तुकडे प्रवाशांच्या खाद्यपदार्थांमध्ये पडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरंतो एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली. ही घटना मध्यरात्री वर्धा स्थानकाजवळ घडली. धावत्या एक्सप्रेसमध्ये अचानक दगडफेक करण्यात आल्याने या घटनेत वातानुकूलित डब्याच्या खिडकीची काच फुटली. फुटलेल्या काचेचे तुकडे प्रवाशांच्या अंगावर पडले. तसेच काही प्रवासी जेवण करत होते. त्यामुळे काचेचे तुकडे त्यांच्या खाद्यपदार्थांमध्येही पडले, या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दुरंतो एक्स्प्रेसमध्ये 25 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजून 27 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. योगायोगाने एका प्रवाशाकडून त्यावेळी भ्रमणध्वनीवर चित्रफीत तयार केली जात होती. त्यामध्ये अचानक दगड खिडकीच्या काचेवर आदळून काच फुटल्याचे दृश्य चित्रित झाले आहे. चित्रफितीत वातानुकूलित डब्यात काही प्रवासी शेजारी बसलेले दिसत आहेत. त्यापैकी एक जण फोनवर बोलत आहे, तर दुसरा प्रवासी जेवणाचा डबा उघडत असल्याचे दिसते. त्याच वेळी अचानक दगड खिडकीची काच फोडून डब्यात येत असल्याचे दिसते.