ठाण्याच्या जोगिला तलावात दोन चिमुकल्या बहिणींचे मृतदेह सापडले, संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्याच्या आंबेडकर रोडवरील खोपट सिग्नलजवळील लॉरी स्टॅण्ड येथे राहणाऱ्या दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचे मृतदेह उथळसर येथील जोगिला तलावात सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या दोन्ही बहिणी शाळेत निघाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या वेळेत न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरू होती. अखेर दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांचे मृतदेह जोगिला तलावात सापडले. नेमके काय घडले? त्या रस्ता चुकल्या होत्या की कोणी त्यांची हत्या केली याबद्दल विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

लॉरी स्टॅण्ड येथील चाळीत राहणाऱ्या गंगी कामी (७) आणि आशा कामी (४) या दोघी बहिणी गुरुवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाल्या. त्या घरी परतल्याच नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला. परंतु त्यांचा शोध लागला नाही. शुक्रवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या दरम्यान दोन मुलींचे मृतदेह जोगिला तलावात आढळल्याची माहिती महापालिकेच्या यंत्रणेला मिळाली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान. राबोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आई-वडिलांनी हंबरडा फोडला
दोन मुलींचे मृतदेह तलावात सापडल्याचे वृत्त कळताच गंगी आणि आशा यांच्या पालकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्या आपल्याच मुली असल्याचे पाहून त्यांच्या आई-वडिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला. हा आकांत पाहून साऱ्यांच्याच डोळ्यांत अश्रू दाटले होते. दरम्यान पुढील कार्यवाहीसाठी या दोघींचेही मृतदेह आधी जिल्हा शासकीय रुग्णालय व त्यानंतर जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले.