गणेश विसर्जनानंतर एकाच वेळी अवजड वाहने रस्त्यावर आली; दिवे, माणकोली, वडपेपर्यंत तुफान वाहतूककोंडी भिवंडी महामार्गावर १५ किलोमीटरच्या रांगा नोकरदार, विद्यार्थी, भाजीपाला, दूधविक्रेते अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेश विसर्जनानिमित्त शुक्रवारी मुंबई-नाशिक महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद ठेवल्यानंतर शनिवारी एकाच वेळी हजारो अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर तुफान वाहतूककोंडी झाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर हायवे दिवे, माणकोली ते थेट वडपेपर्यंत तब्बल १५ किलोमीटरच्या रांगा लागल्या. याचा मोठा फटका गणेश विसर्जनानंतर घरी जाणारे चाकरमानी व प्रवाशांना बसला. तासन्तास ते या वाहतूककोंडीत अडकून पडले होते.

मुंबई-नाशिक महामार्गावर गणेश विसर्जनासाठी रोखून धरलेली अवजड वाहनांची वाहतूक शनिवारी सकाळी सुरू झाली आणि जागोजागी थांबलेले टँकर, डंपर, कंटेनर एकाच वेळी हजारोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघाले. याचा मोठा फटका वाहतुकीला बसला. प्रचंड वाहतूककोंडी झाली. ही कोंडी हायवे येथील दिवे गावापासून ते थेट भिवंडीच्या वडपे गावापर्यंत पोहोचली.

या वाहतूककोंडीचा मोठा फटका नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, भाजीपाला आणि दूध विक्रेत्यांना बसला. भिवंडी-वाडा महामार्गावरील शेलार ते सुपेगाव दरम्यानचा रस्ताही वाहतूककोंडीने ओव्हरपॅक झाला होता. अंबाडीपर्यंत महामार्गाच्या एकाच लेनचे काँक्रिटीकरण झाल्याने दोन्ही दिशांची वाहतूक एकाच लेनवर आली. त्यातच अवजड वाहनांचा लोंढाही आल्याने वाहतूक ठप्प झाली.