नो टेन्शन! आज बँका सुरू राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

28 ते 30 सप्टेंबरला देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. यामुळे चौथा शनिवार आणि रविवार असे एकूण 5 दिवस बँका बंद राहणार असल्याने खातेदारांची अडचण लक्षात घेऊन उद्या, रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे रविवारी देशातील सर्व बँका सुरू राहणार असून रोजच्या सारखा व्यवहार होणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशभरातील सरकारी बँकिंग संस्थांशी चर्चा करून 27 सप्टेंबरला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थ मंत्रालयाच्या निर्देशाला मंजुरी दिली. परंतु बँक अधिकाऱ्यांची संघटना एआयबीओएने रविवारी बँका सुरू ठेवण्याच्या निर्देशाला विरोध केला. सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना आठवड्यात दोन दिवसांची सुट्टी असावी अशी मागणी आहे.

या बँका सुरू

रविवारी भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँकेच्या देशभरातील शाखा सुरू राहतील. या संबंधित अधिकृत माहिती स्वतः बँकेने जाहीर केली आहे. रविवारी ग्राहकांना बँके संबंधित कामे पूर्ण करता येतील.

या बँका बंद

देशाच्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेले निर्देश खासकरून सरकारी बँकांसाठी आहेत. त्यामुळे देशातील एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक तसेच अ‍ॅक्सिस बँक व इतर खासगी बँका बंद राहतील. 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संपामध्ये खासगी बँकांचा सहभाग नसल्याने त्या नियमितपणे खुल्या राहतील.