
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली परिसरातील १० मंडळांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईदरम्यान काही मंडळांच्या डीजेची ध्वनिपातळी ८३ ते तब्बल १०५ डेसिबलपर्यंत नोंदविण्यात आली. याचबरोबर विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडल्याप्रकरणी सात जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ध्वनिपातळीची तपासणी करून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळलेल्या मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या मिरवणुकीतील डीजेची ध्वनिपातळी १०१ डेसिबल नोंदविण्यात आली. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष प्रणव नायडू आणि डीजे चालक विजय मलबारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
खडकपाडा पोलिसांनी शिवांजली मित्र मंडळ आणि जय गणेश मित्र मंडळाविरोधात कारवाई केली. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोशीबागेचा राजा, जरी मंडळ आणि बाल गोपाळ मित्र मंडळाविरोधात कारवाई करण्यात आली. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मंडळांवर कारवाई करण्यात आली.
























































