दहा वर्षांत संबंध नाही, आता श्रेय कशासाठी घेता? मी पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही, स्वीडनच्या खासदार नीला विखे-पाटील यांनी काका आणि चुलत भावाला सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दहा वर्षांत ज्यांच्याशी माझा कोणताही संबंध राहिलेला नाही. आता माझ्या राजकीय यशाचे श्रेय कशासाठी घेता? मी पक्ष बदलणाऱयांपैकी नाही, अशा शब्दांत स्वीडनच्या नवनिर्वाचित खासदार नीला विखे यांनी काका मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह चुलत भाऊ सुजय विखे-पाटील यांना सुनावले.

नीला विखे स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना मंत्री विखे-पाटील पिता-पुत्रांनी त्यांच्या यशाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. त्यावरून नीला विखे म्हणाल्या, कोणीतरी मला एक व्हिडीओ पाठवला, ज्यात सुजय विखे-पाटील महाराष्ट्रात भलेही विखे-पाटलांचा खासदार पराभूत झाला असला तरी कुटुंबाने स्वीडनमध्ये आपला खासदार निवडून आणला आहे, असे सांगताना दिसत आहेत. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळात माझा काका किंवा चुलत भावाशी संपर्क नाही. मी खासदार झाल्यानंतर ते माझ्या यशाच्या आधारे स्वतःचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या विजयानंतर काकांनी मला पह्न करून अभिनंदन केले, पण त्या पलीकडे आमच्यात संवाद झालेला नाही, असा दावा नीला विखे यांनी केला.