
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस शिपायाने सर्व्हिस रिव्हॉ ल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
निगडीतील ट्रान्स्पोर्टनगर बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. कौटुंबिक वादानंतर ते बुधवारी (दि. २३) घरातून निघून गेले होते.
विजय मोतीलाल कोळी (वय ३६, रा. चिखली) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोळी घरातून निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. जाताना त्यांच्याकडे सरकारी पिस्तूल असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणेने त्यांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी निगडी ट्रान्स्पोर्टनगर येथील बस डेपो परिसरात कोळी यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळी सरकारी पिस्तूलही सापडले.
प्राथमिक तपासात त्यांनी त्याच पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. कोळी यांच्यामागे पत्नी, एक तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
























































