
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानचोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने सुमारे 70 हजार पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. एसआयटीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांना पोलीस आणि एसआयटीने ‘क्लीन चिट’ दिली असून त्यांना आरोपी न बनवता सरकारी साक्षीदार बनविले आहे. याशिवाय ट्रस्टचे माजी सदस्य डॉ. अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांचाही आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलेला नाही.
श्रीराम मंदिरात दान म्हणून मिळालेली रक्कम चोरणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना या प्रकरणात आरोपी ठरविण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे 80 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले असून त्यांच्या बँक खात्यांमध्ये 98 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा असल्याचे आढळले आहे. याप्रकरणी एसआयटीने ऑगस्ट महिन्यात राम मंदिर ट्रस्टकडे अंतिम अहवाल सोपवला होता. त्यावेळी चंपत राय यांच्यावर प्रशासकीय देखरेखीत त्रुटी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होत, मात्र आता आरोपपत्रात त्यांना साक्षीदार बनविण्यात आले आहे, तर दानपेटीतील रक्कम मोजून ती बँकेत जमा करण्याची जबाबदारी श्रीवास्तववर होती.
निवृत्त बँक कर्मचारी सुभाष श्रीवास्तव याच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. त्याने अविनाश शुक्ला या आरोपीला चोरी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.
एकूण 133 साक्षीदार
दानचोरीची पहिली तक्रार करणारे कृष्ण मोहन यांना पहिले साक्षीदार बनविण्यात आले आहे. याशिवाय चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांच्यासह 27 पोलीस कर्मचाऱ्यांनाही साक्षीदार बनविण्यात आले आहे. एकूण 133 जणांना साक्षीदार बनविले आहे.
85 वेळा चोरी करताना दिसला आरोपी
या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज हे अतिशय महत्त्वाचा पुरावा ठरले आहे. प्रमुख आरोपींपैकी एक अविनाश शुक्ला हा 85 वेळा दानपेटीतील जमा झालेली रक्कम चोरताना सीसीटीव्हीमध्ये दिसला आहे. याशिवाय चार वेळा त्याने चोरी करण्यासाठी मदत केल्याचे दिसले आहे. याशिवाय रामशंकर यादव याचा भाचा मनीष यादव याने 16 वेळा स्वतः चोरी केली आणि 19 वेळा इतर आरोपींना मदत केल्याचा दावा पोलिसांनी आरोपपत्रातून केला आहे.

























































