
नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश चोलेंद्र शमशेर जंग बहादूर राणा यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी काठमांडू क्राईम ब्रँचच्या पथकाने महाराजगंज येथील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले.
काठमांडू क्राईम ब्रँचमध्ये मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, त्यांच्यावर नेमके कोणते आरोप करण्यात आले आहेत आणि तक्रार कशाशी संबंधित आहे, याचा तपशील पोलिसांनी अद्याप जाहीर केलेला नाही. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून लवकरच अधिक माहिती उघड केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
महाभियोगामुळे झाले होते निलंबित
चोलेंद्र शमशेर जंग बहादूर राणा यांनी 2 जानेवारी 2019 रोजी नेपाळच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर 13 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांच्याविरोधात नेपाळच्या संसदेत महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. तेथील घटनात्मक नियमांनुसार, महाभियोग प्रक्रिया सुरू होताच त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले होते. दीर्घकाळ त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता. अखेर संसदेत महाभियोगाची प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच त्यांच्या निवृत्तीवेतनासह निवृत्तीनंतर मिळणारे सर्व आर्थिक लाभ बहाल करण्याचे आदेश दिले होते.
केपी शर्मा ओलींच्या निर्णयाला दिलेले आव्हान
तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नेपाळची संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरन्यायाधीश राणा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने ओलींचा तो निर्णय रद्द ठरवला होता. त्याच वेळी, ओली यांच्याविरोधात एकत्र आलेल्या नेपाळी काँग्रेस आणि माओवादी आघाडीचे नेते शेरबहादुर देउबा यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्याचे ऐतिहासिक निर्देशही या घटनापीठाने दिले होते.


























































