
दक्षिण आफ्रिकेत बार आणि दुकानावर झालेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 26 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. संशयितांनी पळून जाण्यापूर्वी दोन वाहने जाळली. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पहिली घटना शनिवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली. यात आठ बंदूकधाऱ्यांनी जोहान्सबर्गच्या पश्चिमेकडील एका बारमध्ये घुसून 17 जणांची हत्या केली आणि 15 जणांना जखमी केले. मृतांमध्ये 13 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.
दुसरी घटना रविवारी पहाटे केप टाउनजवळील एका टाउनशिपमधील मनोरंजन स्थळावर घडली. बंदूकधाऱ्यांनी 10 जणांची हत्या केली आणि 11 जणांना जखमी केले. यातील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतरांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
दोन्ही प्रकरणांमध्ये अद्याप एकाही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेत, टोळीयुद्ध आणि बेकायदेशीर धंद्यातील स्पर्धा यामुळे सतत हिंसाचाराच्या घटना घडत असतात.
























































