
राम मंदिर (पूर्व) येथील मृणालताई पुलाजवळील एका सार्वजनिक शौचालयात विषारी वायुमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. विषारी वायू श्वासावाटे शरीरात गेल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. प्रभाकर धनीवार (24) आणि भाविन देसाई (18) अशी मयत तरुणांची नावे आहेत.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दोन्ही तरुणांना ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोन्ही तरुणांना मृत घोषित केले. या घटनेचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून, अनेक प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
महापालिकेच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 8.30 वाजता स्थानिक रहिवाशांनी एका सार्वजनिक शौचालयात तीव्र रासायनिक वास येत असल्याची आणि दोन व्यक्ती गुदमरत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि संबंधित बीएमसी वॉर्डचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बाधित तरुणांना उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांना रात्री रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना पहाटे 3.49 वाजता मृत घोषित केले. प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू आहे. तपासानंतरच घटनेचे नेमके कारण आणि रासायनिक गळतीचा स्रोत स्पष्ट होईल.
























































