
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूकडून देशाला पदकाची अपेक्षा होती. तिने आपल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करत पदकाच्या दिशेने पाऊल टाकतं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र, क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या चेन यूफेईविरुद्ध तिला पराभवाचा सामना करावा लागला आणि तिचा आशियाई क्रीड स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. मात्र, यानंतर पीव्ही सिंधू चांगलीच संतापली असून स्पर्धेच्या वेळापत्रकावर आणि आयोजनावर तिने आक्षेप घेतला आहे.
पीव्ही सिंधूला 24 तासांच्या आत तब्बल तीन एकेरी सामने खेळावे लागले. ज्यामध्ये शनिवारचे तिचे दोन सामने असून दुसरा सामना मध्यरात्रीनंतर संपला होता. यानंतर अवघ्या काही तासांतच तिला रविवारी क्वार्टर फायनलसाठी पुन्हा कोर्टवर उतरावे लागले, ज्यामुळे शरीराला रिकव्हर होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याच ती म्हणाली आहे. सततच्या सामन्यांमुळे खेळाडूंच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे सांगताना सिंधू म्हणाली की, एका दिवसात दोन सामने खेळल्यानंतर शरीराला विश्रांती मिळणे अत्यंत गरजेचे असते. खेळाडू मानसिकदृष्ट्या कितीही तयार असला, तरी थकलेल्या शरीराला विश्रांतीची गरज असते, असे तिने स्पष्ट केले. सामना चांगला झाला असला तरी स्पर्धेचे वेळापत्रक अधिक चांगले आणि खेळाडूंना अनुकूल असायला हवे होते, अशी खंत तिने व्यक्त केली. NDTV ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या वेळापत्रकासोबतच सिंधूने क्वार्टर फायनल सामन्यादरम्यान ‘हॉक-आय’ (Hawk-Eye) सुविधा उपलब्ध नसल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली. काही महत्त्वाचे शॉट लाईनच्या अतिशय जवळ होते, परंतु खेळाडूंना पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी हॉक-आयचा पर्याय उपलब्ध नव्हता. त्याचबरोबर पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, जर माझ्यामध्ये ती क्षमता असेल, तर नक्कीच हो. मला फक्त दुखापतींपासून दूर राहायचे आहे.” असं म्हणत तीने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

























































