
दिल्लीतील रस्त्यांच्या पाहणीदरम्यान दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप नेते परवेश वर्मा यांनी एका तरुणाला कानशिलात लगावल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर रविवारी दिल्लीत मोठा राजकीय वाद निर्माण झाला. “या मारहाणीचा स्पष्ट व्हिडीओ पुरावा उपलब्ध असूनही पोलिसांकडून अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही,” असा आरोप करत आम आदमी पक्षाने मंत्र्यांविरोधात निदर्शने केली असून त्यांच्या तत्काळ अटकेची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम दिल्लीतील टिळक नगर भागात रविवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम मंत्री परवेश वर्मा हे एका नव्याने बांधलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी स्थानिक आप आमदार जरनैल सिंह हेदेखील तिथे पोहोचले. आमदार जरनैल सिंह आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या निकृष्ट दर्जावरून प्रश्न उपस्थित करत हातानेच रस्त्याचा काही भाग उखडून दाखवला.
याचवेळी आपच्या सोशल मीडिया टीमचा सदस्य आणि जरनैल सिंह यांचा सहकारी साहेब सिंह हा या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड करत होता. व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू असल्याचे पाहताच परवेश वर्मा यांचा संयम सुटला. त्यांनी साहेब सिंह यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्यांना सर्वांसमोर कानशिलात लगावली. तसेच, सुरक्षारक्षकांनीही तरुणाची मान पकडून त्याला बाजूला ढकलले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मंत्र्यांच्या तातडीच्या अटकेची मागणी केली आहे.
दिल्लीचे आप प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी परवेश वर्मा यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “एका सामान्य तरुणाला मारहाण करणारे परवेश वर्मा हे भित्रे आहेत. व्हिडीओ पुरावा समोर असतानाही दिल्ली पोलीस त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत? तुम्ही एवढे मोठे पैलवान आहात, तर पोलिसांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या मागे का लपून बसला आहात?”






















































