
केंद्रीय निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे असून निवडणूक आयोगाच्या कामकाजाचीच सखोल चौकशी करण्यात यावी तसेच ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करताच आयोगाच्या वतीने निर्णय घेत होते, अशी इतर दोन आयुक्तांची तक्रार आहे. त्याचे कुणी खंडनही न केल्याने मुख्य निवडणूक आयुक्त अधिकारांचा गैरवापर करत होते हे स्पष्ट झाले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची मागणी करावी, विरोधी पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग आणावा, असे त्यांनी म्हटले आहे.






















































