सामना अग्रलेख – असंतोषाच्या कोठारावर देश, मोदी वाजवतात डफली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपची हुकूमशाही व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या माफियागिरीविरुद्ध देशभक्तांनी एल्गार पुकारला आहे. पुन्हा कॉक्रोच जनता पार्टीने स्वतंत्र आंदोलनाचे रणशिंग फुंकून ‘करो या मरो’च्या लढ्यात आपलाही झेंडा फडकवला आहे. देश जागा झाला आहे. मोदींनी डफली वाजवून स्वतःचे अज्ञान प्रकट केले आहे. अमित शहांची बोबडी वळली आहे. ज्ञानेश कुमार गपगार झाले आहेत. देश वाचविण्याची ही लढाई जागतिक लोकशाहीसाठी प्रेरक ठरेल.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भारतीय लोकशाहीची पुरती धूळधाण केली आहे याबाबतचा सत्य रिपोर्ट ‘इंडियन एक्प्रेस’ने प्रसिद्ध केला. एरवी लोकांना नियम, कायद्याचे धडे देणारे, प्रवचने देणारे, भाजप विरोधकांवर डाफरणारे ज्ञानेश कुमार तेव्हापासून मौनात गेले आहेत. त्यांची वाचा गेली आहे. गृहमंत्री अमित शहासुद्धा गायब आहेत. एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे डफली वाजवताना दिसले, पण यापैकी कोणीही भारतीय लोकशाहीवर आलेल्या संकटाबाबत चकार शब्द उच्चारलेला नाही. यादरम्यान केरळ राज्याचे माजी मुख्य सचिव जिजी थॉम्सन यांनी खुलासा केला आहे की, ज्ञानेश कुमार यांनी त्यांच्याशी संपर्क करून केरळातून लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. इतकेच नव्हे तर केंद्रात मंत्री करण्याबाबतही वचन दिले होते. ही बाब गंभीर आहे आणि ज्ञानेश कुमार हे संविधानिक खुर्चीवर बसून भाजपची दलाली करीत होते, प्रशासनातील अधिकाऱ्यांवर भाजपला मदत करण्यासाठी दबाव आणत होते व राजकीय प्रलोभने दाखवत होते. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्लज्ज कृतीचे भाजप जोरदार समर्थन करीत आहे हे अधिक दुर्दैवी आहे. ज्ञानेश कुमार हे कसे बरोबर आहेत व काँग्रेस राजवटीतील निवडणूक आयुक्त कसे अपराध करीत होते याची डफली वाजवण्याचे काम भाजप प्रवक्त्यांनी सुरू केले आहे. त्यात भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील सामील झाले आहेत. निवडणूक आयोग एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. त्याच्यावरील

आरोपांचे उत्तर

तो देईल. भाजपने चोरांची बाजू घेऊन लढावे हे गंभीर आहे. ज्ञानेश कुमार हे देशाचे शत्रू क्रमांक एक आहेत. भारतीय लोकशाहीला या माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी सुळावर चढवले व त्याची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी. गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिकारात काम करणारा आयोग यापेक्षा वेगळा कसा वागू शकेल? हा प्रश्न आहेच. पण ज्ञानेश कुमार यांचा मुखवटा ‘इंडियन एक्प्रेस’ने फाडताच जनता जागी झाली व मोदी-शहांच्या राजवटीविरुद्ध जागोजागी घोषणा देत संताप व्यक्त करू लागली. मुंबईतील मेट्रो, लोकल ट्रेन, फलाटांवर ‘मोदी-शहा मुर्दाबाद’चे नारे सुरू झाले आहेत. मागच्या दोन दिवसांत ‘जंतर मंतर’वर रोज हजारो लोक जमत आहेत व देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यात आम्हालाही उतरायचे आहे असे सांगत आहेत. यापैकी अनेकांना पोलिसांनी अटक केली. ‘जंतर मंतर’ परिसराला अमित शहांच्या सशस्त्र पोलिसांनी घेरले आहे. अमित शहा ज्या कृष्ण मेनन रोडवर राहतात त्या संपूर्ण परिसराला सैन्य छावणीचा वेढा पडला आहे. ही भीती हाच सरकारचा पराभव आहे. भारतीय जनता पक्षाच्या पतनाची सुरुवात झाली आहे हेच खरे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील व जे या माणसाला वाचवण्यासाठी पुढे येतील त्यांना जनतेच्या संतापाला तोंड द्यावे लागेल. नेपाळ, बांगलादेशात घडले त्याच पद्धतीचा संताप व आक्रोश भारतीय जनतेत दिसत आहे. असंतोषाच्या स्फोटक कोठारावर मोदी-शहांचे सरकार बसले आहे व त्या स्फोटकांना काडी लागायचा अवकाश, यांचे

भ्रष्ट इमले खाक

होतील. ज्ञानेश कुमार यांनी भाजपला निवडणुका जिंकून देण्यासाठी पापकर्मांची मालिकाच घडवली. त्याआधी राजीव कुमार या नावाचे निवडणूक आयुक्त तेच करीत होते. मोदी-शहांनी या सर्व संस्थांना गुलाम बनवले व लोकशाही आणि स्वातंत्र्याचा लिलाव केला. 13 कोटी मतदारांना वगळले ही 2029 च्या विजयाची पायाभरणी होती. प. बंगाल, महाराष्ट्र, बिहारच्या विधानसभा निवडणुकांत अशा पद्धतीने लाखो मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले. गुजरातच्या व्यापारी डोक्याच्या राज्यकर्त्यांनी लोकशाहीचा हा असा गळा कापला. आता या आरोपींचा पाठलाग जनतेने सुरू केला आहे. मतभेदांच्या सर्व भिंती पाडून विरोधी पक्ष एकवटला आहे. प. बंगालात तर आश्चर्यच घडले. ममता बॅनर्जी यांनी ‘डाव्या’ पक्षांना लढाईत सामील होण्याचे निमंत्रण दिले. राहुल गांधी यांना ममता बॅनर्जी यांनी फोन करून सांगितले, ‘‘इंडिया आघाडीची बैठक घ्या व पुढील लढाईची रणनीती ठरवा.’’ हे सुचिन्ह आहे. भाजपची हुकूमशाही व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या माफियागिरीविरुद्ध देशभक्तांनी एल्गार पुकारला आहे. पुन्हा कॉक्रोच जनता पार्टीने स्वतंत्र आंदोलनाचे रणशिंग फुंकून ‘करो या मरो’च्या लढ्यात आपलाही झेंडा फडकवला आहे. देश जागा झाला आहे. मोदींनी डफली वाजवून स्वतःचे अज्ञान प्रकट केले आहे. अमित शहांची बोबडी वळली आहे. ज्ञानेश कुमार गपगार झाले आहेत. देश वाचविण्याची ही लढाई जागतिक लोकशाहीसाठी प्रेरक ठरेल.