एसआयआरमध्ये मृत दाखवलेले मतदार जिवंत, निवडणूक आयोगाच्या षड्यंत्राचा रोहित पवार यांच्याकडून पर्दाफाश; थेट व्हिडीओ कॉलच लावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेच्या नावाखाली निवडणूक आयोगाने रचलेल्या षड्यंत्राचाच आज पर्दाफाश केला. एसआयआरमध्ये मृत दाखवलेले मतदार जिवंत आहेत आणि दुबार मतदार दाखवलेले मतदार तर शोधूनही सापडत नाहीत याचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आज सादर केले. इतकेच नव्हे तर, भर पत्रकार परिषदेतूनच त्यांनी एसआयआरमध्ये मृत दाखवलेल्या 75 वर्षांच्या आजोबांना व्हिडीओ कॉल केला.

रोहित पवार यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन आकडेवारीसह सादरीकरण करत निवडणूक आयोगाचा घोटाळा समोर आणला. कर्जत-जामखेडच्या पाडळी गावचे मधुकर सर्भोजेराव भोसले या 75 वर्षीय आजोबांना एसआयआर प्रक्रियेत निवडणूक आयोगाने मृत दाखवून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळले. मात्र ते हयात असून रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतूनच भोसले आजोबांना थेट व्हिडीओ कॉल लावला.

ज्ञानेश हे भाजपच्या हातचे बाहुले

ज्ञानेश कुमार स्वतःला राजा समजतात. आयोग त्यांच्या बापाचा आहे का असा संताप व्यक्त करतानाच, देशद्रोही ज्ञानेश कुमार भाजपच्या हातातील बाहुले आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

 लोकसभेत महाराष्ट्रात भाजपचा पराभव होताच विधानसभेला केवळ एका महिन्यात 6.5 लाख मतदार वाढविण्यात आले. लोकसभेपेक्षा विधानसभेला तब्बल 71 लाख मतदान अधिक झाले असून या संपूर्ण प्रकारात ईव्हीएम मॅनेज केले जात असल्याची चर्चा आहे, असे रोहित पवार म्हणाले.

 महाराष्ट्रात 9.78 कोटी मतदार आहेत आणि आता 2.6 कोटी नावे वगळली आहेत. खडकवासलात 5,76,5055 मतदार होते. एसआयआरमधून 2,77,851 मतदार वगळले; मात्र 2024 मध्ये 3,26,667 एवढे मतदान झाले होते. त्यामुळे येथे बाहेरून माणसे आणली गेली. त्यांच्याकडून मतदान करून घेतले गेले आणि आता त्यांची नावे वगळली जात आहेत, असे रोहित पवार म्हणाले.