
विस्तीर्ण समुद्रकिनारा, पर्यावरणाचे संतुलन राखणारे खारफुटीचे जंगल, स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास, प्राचीन मंदिर आणि निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेल्या पालघर जिह्यातल्या किनारपट्टीवरील सहा गावांमध्ये एस्सार कंपनीचा रासायनिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी सर्व्हे सुरू झाला आहे. मात्र ग्रामस्थांनी या प्रकल्पाचा कडाडून विरोध केला आहे.
पालघर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या उसरणी, मथाणे, भादवे, दांडा, खटाळी आणि मधुकरनगर या सहा गावांमध्ये तब्बल बाराशे हेक्टर जमीन एस्सार कॅपिटल अॅडव्हायझरी इंडिया प्रा. लि. या कंपनीसाठी औद्योगिक विकासाच्या प्रस्तावात समाविष्ट करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एमआयडीसी आणि एस्सार कंपनीमध्ये जानेवारी 2026 मध्ये सामंजस्य करार झाला आहे, पण या सहा गावातल्या ग्रामस्थांनी महसूल मंत्र्यांपासून पालघर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे.
निसर्गाची चौफेर उधळण
या भागाच्या दक्षिणेस वैतरणा नदी, उत्तरेला दांडा खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र, आणि पूर्वेला दोन ते तीन हजार हेक्टरवर पाणथळ अशा स्वरूपाच्या चौफेर खाऱ्या पाण्याने वेढलेल्या सुमारे सोळा चौरस किलोमीटरचा भूभाग प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. या भागात निसर्गदत्त गोड्या पाण्यामुळे तसेच उसरणी गावात बांधलेल्या सुमारे पंचवीस एकरवरील जलाशयामुळे या भागाला मोठा फायदा झाला असून शेती व बागायतीचा व्यवसाय पिढ्यान् पिढ्या सुरू आहे.
भूसंपादनाला विरोध
भूसंपादनासाठी अधिसूचित जमिनीच्या सात-बारा उताऱ्यांच्या आधारे जमीनमालकांना वैयक्तिक नोटीस बजावली.
खारफुटी-पक्ष्यांचा अधिवास
या भागात खाजण जमीन व विस्तीर्ण खारफुटीचे वन आहे. फ्लेमिंगो, माळढोकसारख्या सुमारे 35 प्रजातींच्या स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे.
भाजीपाला आणि मासेमारी
या भागातील सर्व गावांमध्ये पावसाळी, शेती, उन्हाळी भाजीपाला, कारली, भेंडी स्ट्रॉबेरी, दुधी असा भाजीपाला पिकतो. मच्छीमार बांधव तर समुद्रकिनारपट्टीवरील प्रवाळ दगडातील शिंपले, कालवे, शेवंडे, कोळंबीची मच्छीमारी करून गुजराण करीत आहेत. तरुण शेतकऱ्यांचे पोल्ट्री फार्म, पर्यटन केंद्र असे जोडव्यवसाय आहेत. मुंबई, नाशिक, पुण्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.



























































