
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्ताधाऱयांच्या कारभाराविरोधात विरोधी सभासदांनी घोषणाबाजी करत फलक फडकावले, तर सत्ताधाऱयांच्या समर्थक सभासदांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी व्यासपीठाच्या दिशेने येणाऱया काही सभासदांना पुढे बसलेल्या सभासदांनी अडवल्याने वादावादीचा प्रकार घडला. त्यामुळे सभेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान, गोंधळातच सर्व विषय मंजूर करत केवळ अर्ध्या तासात सभेचे कामकाज संपण्यात आले.
सभेनंतर सत्ताधाऱयांचा निषेध करत विरोधकांनी सभागृहाबाहेर निदर्शने केली. मागील निवडणुकीत सत्ताधाऱयांनी दिलेली आश्वासने न पाळल्याने त्यांच्या वचननाम्यांची होळी शिक्षक समितीच्या महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सभा माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफ्चरींग असोसिएशनच्या हॉलमध्ये झाली. बँकेचे अध्यक्ष अशोक घागरे अध्यक्षस्थानी होती. यावेळी उपाध्यक्ष कृष्णा पोळ, संचालक रुपाली गुरव, संजय महिंद, अनिता काटे, फत्तू नदाफ, मिलन नागणे, नितीन चव्हाण, अमोल शिंदे, अमोल माने, राहुल पाटणे, सचिन खरमाटे, शिवाजी जाधव, अजितराव पाटील, गांधी चौगुले, शरद चव्हाण, स्वाभिमानी मंडळाचे नेते अविनाश गुरव आदी उपस्थित होते.
शिक्षक बँकेची पुढील वर्षी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱयांची ही शेवटचीच वार्षिक सभा होती. गेल्या वर्षभरात झालेल्या घडामोडी, सत्ताधारी स्वाभिमानी मंडळात पडलेली फूट, यातून झालेला सत्ताबदल, विरोधी संचालकांचा सत्तेत शिरकाव या सर्व घटनांचे पडसाद सभेत उमटेल. निवडणूक पूर्व ही शेवटचीच सभा असल्याने विरोधकही आक्रमक होते. सभा सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ सुरू केला होता. यावेळी विरोधकांनी घोषणांचे फलकही फडकावले.
नेहमीप्रमाणे सत्ताधारी समर्थक सभासदांनी व्यासपीठासमोर जागा अडवून विरोधकांची कोंडी केली. त्यामुळे विरोधकांना व्यासपीठापर्यंत जाताच आले नाही. गोंधळातच बॅँकेचे अध्यक्ष अशोक घागरे यांनी सभेचे कामकाज सुरू केले. यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे अध्यक्षांचे भाषण कुणालाच ऐकू आले नाही. सभागृहात केवळ गोंधळ, घोषणाबाजी सुरू होती. बॅँकेचे सीईओ शिवाजी लाड यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सत्ताधारी व विरोधकांच्या गोंधळातच मंजूर, नामंजूरच्या घोषणाबाजीत सर्व विषय मंजूर करण्यात आले. यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सभेचे कामकाज संपविण्यात आले.
सभा संपल्यानंतर विरोधी शिक्षक समितीने राज्य नेते सायाजी पाटील व जिल्हाध्यक्ष शशिकांत बजबळे यांच्या नेतृत्वाखाली, तर व शिक्षक संघ स्वाभिमानी मंडळाने विनायक शिंदे, संतोष जगताप यांच्या नेतृत्वाखाली सभागृहाबाहेर सत्ताधाऱयांच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रागिनी पाटील, सरचिटणीस अर्चना कोळेकर, शैलजा चव्हाण, शीतल इथापे, स्मिता पाटील आदी उपस्थित होते.





























































