
गाझियाबादमधील साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोसायटीच्या 10व्या मजल्यावरून उडी मारून सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीने शनिवारी संध्याकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत विद्यार्थिनी राजेंद्रनगर येथील एका नामांकित शाळेत शिक्षण घेत होती. या घटनेनंतर तिच्या वैयक्तिक डायरीत गणिताच्या शिक्षकाकडून होणाऱ्या त्रासाचा आणि छळाचा उल्लेख आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी तिच्या कुटुंबातील दोन मुलींपैकी धाकटी होती. शनिवारी रात्री खेळायला जाते असे सांगून ती घरातून बाहेर पडली होती. थोड्याच वेळात ती 10व्या मजल्यावरून खाली पडल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी तातडीने तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. माहिती मिळताच साहिबाबाद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनानंतर तो कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. रविवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच मृत विद्यार्थिनीची वर्गमैत्रीण शनिवारी रात्री तिच्या घरी आली होती. तिने दिलेल्या माहितीनुसार, शाळेत नुकत्याच अंतर्गत परीक्षा झाल्या होत्या आणि शुक्रवारी मिळालेल्या उत्तरपत्रिकेत मृत विद्यार्थिनीला 30 गुण मिळाले होते. गुण पाहिल्यानंतर तिने वर्गमैत्रीणीजवळ शिक्षकांना वाईट वाटेल असे काहीतरी करणार असल्याचे विधान केले होते. तसेच तिने मृत विद्यार्थिनीच्या डायरीबद्दलही सांगितले.
त्यानंतर कुटुंबीयांनी तिची शाळा डायरी तपासली, जिचे रूपांतर तिने वैयक्तिक डायरीत केले होते. या डायरीत जुलै महिन्यापासून एका शिक्षकाकडून होणाऱ्या त्रासाची नोंद करण्यात आली होती. एका पानावर तिच्या गणिताच्या शिक्षकाचे नाव स्पष्टपणे लिहिलेले आढळले. पालक-शिक्षक बैठकीपूर्वी त्रास कमी होता, मात्र पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर हा त्रास अधिक वाढल्याचे डायरीत नमूद आहे. मुलीला इतर सर्व विषयांत 80 ते 90 गुण मिळत असताना केवळ गणितातच कमी गुण मिळाले होते. शिक्षकाने मुद्दाम कमी गुण देऊन नंतर त्याच गुणांवरून मानसिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
साहिबाबादचे एसीपी अमित सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप कुटुंबाकडून अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. कुटुंबीयांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.



























































