
बंगळुरूतील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. गुवाहाटीहून बंगळुरूला जाणारे इंडिगो विमान केंपेगौडा विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमानाचा मागील भाग धावपट्टीला धडकला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही घटना घडल्याने विमान कंपनीने सांगितले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे 6E 6542 हे विमान गुवाहाटीहून बंगळुरूला चालले होते. विमानाचा बंगळुरूतील केंपेगौडा विमानतळावर लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्याने गो अराऊंड केले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा लँडिंगचा दुसरा प्रयत्न केला. मात्र यावेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीला धडकला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत, असे इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे.
मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली, असे विमान कंपनीने सांगितले. सध्या विमानाची देखभाल आणि तपासणी केली जात आहे आणि आवश्यक ती मंजुरी मिळाल्यानंतर ते पुन्हा सेवेत दाखल होईल, असे कंपनीने स्पष्ट केले. सेवेमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून, त्यानंतरच्या बेंगळुरू-कोइम्बतूर प्रवासासाठी पर्यायी विमानाची व्यवस्थाही करण्यात आली.


























































