
निळाशार समुद्रकिनारा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. पण समुद्रातील कचरा जेव्हा किनाऱ्यावर येतो त्यावेळी हाच किनारा विद्रूप दिसतो. आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून मीरा-भाईंदरमधील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी, नागरिक आणि स्वयंसेवकांची फौज या किनाऱ्यावरील कचऱ्याला भिडली आणि काही वेळातच उत्तनचा किनारा लख्ख झाला. वनविभाग, फॉर फ्यूचर इंडिया व मॅग्रोव्ह फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबवली.
1 हजार 800 किलो कचरा हटवला
समुद्रकिनारा स्वच्छता अभियानांतर्गत तब्बल 1 हजार 800 किलो कचरा हटवण्यात आला. गेली सहा वर्षे उत्तनचा किनारा स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. त्यासाठी वनक्षेत्रपाल मनीष पवार, एनएसएसचे क्षेत्रीय समन्वयक अरुणा गुजर, मीरा-भाईंदर पालि केचे अधिकारी अरविंद चाळके, सुशिला डायस, हर्षद ढगे, ध्रुव कडारा, सिद्धेश कांबळे आदींचे सहकार्य लाभले.

























































