
कल्याण-शिळ महामार्गावरील काटई नाका येथे एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह आज सकाळी निकामी झाल्याने डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागासह परिसरातील ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. ऐन सुट्टीच्या दिवशी सकाळपासून नळांना पाणी न आल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेक सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्यांनी तळ गाठल्याने रहिवाशांवर पाणीबाणीची वेळ आली.
काटई नाका येथील एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जलवाहिनीतील पाण्याचा दाब अचानक कमी झाला. परिणामी डोंबिवली एमआयडीसीचा निवासी परिसर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. रविवार असल्याने घरातील साफसफाई, धुणी-भांडी आणि अन्य दैनंदिन कामांसाठी पाण्याची मागणी वाढलेली असतानाच हा बिघाड झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याचे लक्षात येताच विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी पाण्याच्या टाक्यांची पाहणी केली. अनेक ठिकाणी टाक्यांमध्ये अत्यल्प पाणी शिल्लक असल्याने नागरिकांनी पिण्याचे तसेच घरगुती वापराचे पाणी जपून वापरण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी रहिवाशांना धावपळ करावी लागली.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि तंत्रज्ञांचे पथक तातडीने काटई नाका येथे दाखल झाले. नादुरुस्त व्हॉल्व्ह काढून त्याऐवजी नवीन व्हॉल्व्ह बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. यासाठी क्रेनसह आवश्यक यंत्रसामग्री घटनास्थळी आणण्यात आली. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. बिघाड दुरुस्त केल्यानंतर रात्री उशिरा पाणीपुरवठा सुरळीत झाला.


























































