
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शंकरपूर उपवनक्षेत्रातील वगाडपेठ परिसरात विजेचा धक्का लागून एका तीन वर्षीय मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या एका बंदराचा पाठलाग करत होता. पाठलाग करताना अचानक हा बिबट्या विजेच्या डीपीवर चढला. यादरम्यान विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत ज्या प्राण्याचा बिबट्या पाठलाग करत होता, त्या बंदराचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, मानद वन्यजीव रक्षक आमोद गौरकर, वनपाल राजेंद्र मेश्राम यांच्यासह वनविभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

























































