फरिदाबादमध्ये हृदयद्रावक घटना; उघड्या बोअरवेलमध्ये पडून 3 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरियाणातील फरिदाबादमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. फरिदाबादमधील सिही गावात खेळत असताना, एक तीन वर्षांची मुलगी सुमारे 200 फूट खोल असलेल्या एका जुन्या आणि उघड्या बोअरवेलमध्ये पडली. या चिमुरडीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस, प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करत रात्रभर बचावकार्य राबवले. मात्र, सोमवारी पहाटे जेव्हा तिला बाहेर काढण्यात आले, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

रविवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजता ही मुलगी बोअरवेलजवळ खेळत असताना अचानक या उघड्या खड्ड्यात पडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच घबराट उडाली आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. ही बोअरवेल अत्यंत जुनी असून बऱ्याच काळापासून वापरात नव्हती आणि ती उघडी ठेवण्यात आल्यामुळेच ही घटना घडली.

दरम्यान, रात्री सव्वासातच्या सुमारास एनडीआरएफ नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळताच त्यांचे पथक रात्री नऊ वाजता घटनास्थळी दाखल झाले. मुलीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पथकाने बोअरवेलला समांतर खड्डा खोदून बोगदा तयार करण्याचा निर्णय घेतला. एनडीआरएफ आणि प्रशासनाच्या वतीने रात्रभर ऑक्सिजनचा पुरवठा करत अत्यंत काळजीपूर्वक उत्खनन करण्यात आले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुलीला बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेमुळे सिही गावात शोककळा पसरली असून, उघड्या आणि वापरात नसलेल्या बोअरवेलच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.