नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 24 जणांचा मृत्यू, 14 जण बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये गेले तीन मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूर आला असून भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. गेल्या तीन दिवसांत पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण बेपत्ता झाले आहेत. पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आत तकने दिलेल्या वृत्तानुसार, मनांग, म्याग्दी, बागलुंग, परबत आणि पाल्पा यासह अनेक जिल्ह्यांना पूर आणि भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. गंडकी प्रांतातील बागलुंग जिल्ह्यात 10, म्याग्दी जिल्ह्यात 6 आणि मनांग जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. लुंबिनी प्रांतातील पाल्पा येथे 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. धनुषा जिल्ह्यातील मिथिला नगरपालिकेत भूस्खलनात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बाधित जिल्ह्यांमध्ये चौदा जण अजूनही बेपत्ता आहेत.

पूर आणि भूस्खलनामुळे 747 कुटुंबे बाधित झाली आहेत. यापैकी 143 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 51 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. गंडकी प्रांताच्या 11 जिल्ह्यांपैकी, परबतमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. 106 घरांचे पूर्णपणे आणि 4 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. 162 कुटुंबांमधील 540 लोक विस्थापित झाले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे 6 पूल पूर्णपणे आणि 2 पुलांचे अंशतः नुकसान झाले आहे.