
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या मनोज चिवडा सेंटरमधून खरेदी केलेल्या चिवड्यात पाल आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. हा चिवडा खाल्ल्यानंतर ७ जणांची प्रकृती बिघडल्याने वरोरा शहरात खळबळ उडाली आहे.
प्रकृती बिघडलेल्या नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, घटनेची माहिती मिळताच आमदार करण देवतळे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, मनोज चिवडा सेंटरवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
चिवड्यात पाल आढळल्याच्या घटनेची संबंधित प्रशासनाकडून चौकशी करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सात ही जणांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.




























































