
महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. शेतकर्यांसह सामान्य जनता भयभीत झाली आहे. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आणि योजना जाहीर केल्या. योजनांचा जो जीआर आहे, तोच फसवा आणि दिशाभूल करणारा आहे. या योजनामधून शेतकर्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. शासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे म्हणून संतप्त शिवसैनिकांनी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी आज शासनाने जारी केलेल्या अध्यादेशाची होळी केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
फडणवीस सरकारने महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना धीर देण्यासाठी योजना जाहीर केल्या. त्या योजना डोळ्याखालून घातल्यावर शेतकर्यांची, कशी फसवणूक केली जात आहे, हे लगेच लक्षात येते. जमिन महसूलात सुट, पीक कर्जाचे पुर्नगठण, शेतीच्या कर्जाला स्थगिती, वीज बिलात सूट, रोहयोच्या कामात निकषात सूट, यात हवालदिल झालेल्या शेतकर्याच्या पदरात काय पडणार, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण जमीन, महसूल तुटपुंजी असते. पीक कर्जाचे पुर्नगठण दरवर्षीच होते. वीज बिलात सुट म्हणजे काय, जेथे विहिरीला पाणीच नाही, भीजवायसारखं शेतात शिल्लंक काही राहिलं नाही. वीज वापरली जाणार नाही त्यात सरकार काय सूट देणार. म्हणजे फडणवीस सरकारने शेतकर्यांच्या फक्त डोळ्यात धूळफेक केली आहे. कागदी घोडे नाचवले आहेत. जाहीर केलेल्या आदेशातून शेतकर्यांच्या पदरात काहीही पडणार नाही. शेतकर्यांची चूल पेटणार नाही. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. यातून सरकारने थेट मदतीचा आधार देणे गरजेचे होते. मात्र सरकार फक्त फेकाफेकी करत आहे. काढलेला आदेशच दिशाभूल करणारा असल्याने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठवाडा संपर्क नेते आमदार अंबादास दानवे, संपर्कप्रमुख अशोक सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली.
फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा देत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी तालुकाप्रमुख गोरख सिंगण, जिल्हा सहसचिव श्रीकृष्ण गायके, शहादेव जोगदंड, देवा गुंजाळ, बाबु कुटे, अमोल कुटे, ज्ञानेश्वर सिंगण, सुनिल कदम, लक्ष्मण डुकरे, सचिन पवार, नवनाथ देवकर, उपतालुकाप्रमुख अशोक सागळे, तालुका सचिव नंदू येवले, संदीप भानप यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



























































