नागोया नगारा, …अन् बस पोहोचली भलत्याच मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या व्हॉलीबॉल संघाला सोमवारी अनोख्या अडचणीचा सामना करावा लागला. उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघाची बस चक्क चुकीच्या जिम्नॅशियममध्ये पोहोचली. कर्णधार मुराद जहांने बसमधूनच सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. वेळ कमी झाल्याने खेळाडूंना योग्य वॉर्म अपही करता आला नाही. काही खेळाडूंना चालत्या बसमध्येच खेळाचा पोशाख बदलावा लागला.  मात्र या गोंधळाचा परिणाम मैदानावर होऊ दिला नाही आणि पाकिस्तानने उझबेकिस्तानचा 3-0 असा पराभव केला.

चाहत्यांचा ‘सोल्ड–आऊट’ उत्साह पावसाने भिजला

फिलिपिन्सची टेनिस स्टार अॅलेक्स एला हिच्या सामन्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी करण्याची तयारी केली होती. मात्र मुसळधार पावसामुळे तिचा सामना 3,500 प्रेक्षकांच्या आऊटडोअर कोर्टऐवजी इनडोअर कोर्टवर हलवण्यात आला. परिणामी एला जिंकली तेव्हा तिच्यासमोर मोठा प्रेक्षकवर्ग नव्हता. मोजके चाहते, अधिकारी आणि स्वयंसेवकच उपस्थित होते. एला मात्र विचलित झाली नाही आणि थायलंडच्या पॅचरिन चिपचंदेजचा 6-1, 6-0 असा धुव्वा उडवला.

डिस्क्वालिफाय, अपील आणि अचानक अंतिम फेरीत

दक्षिण कोरियाच्या पुरुष 4 बाय 100 मीटर रिले संघासाठी रविवारचा निर्णय सोमवारी उलटला. बॅटन एक्स्चेंजच्या नियमभंगामुळे संघाला सुरुवातीला अपात्र ठरवण्यात आले होते. प्रशिक्षकांनी लगेच अपील केले आणि ते मान्य झाले. त्यामुळे किम सि-ऑन, जोएल जिन न्वामाडी, डॅनियल बिवेसा आणि ली जे-सोंग यांचा संघ पुन्हा अंतिम फेरीत दाखल झाला. मैदानाबाहेरचा एक निर्णय बदलल्याने धावपटूंना दुसरी संधी मिळाली.

14 वर्षांची ‘धनुर्धारी वादळ’

दक्षिण कोरियाच्या अवघ्या 14 वर्षांच्या कांग येओन-सिओने महिला पंपाऊंड तिरंदाजीमध्ये मोठा धक्का दिला. आशियाई स्पर्धेची माजी विजेती ज्योती सुरेखा हिला तिने बाद केले. कांगने तब्बल 150 गुणांचा परिपूर्ण स्कोअर नोंदवला. आशियाई स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यातच एवढी अचूकता दाखवत या किशोरवयीन खेळाडूने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

जपानने सामना फिरवला

हाँगकाँगच्या डू होई-पॅम आणि एनग विंग-लॅम यांनी महिला टेबल टेनिस दुहेरीच्या उपांत्य सामन्यात जपानच्या हीना हयाता आणि मिवा हारिमोटोविरुद्ध सुरुवातीला चार गुणांची आघाडी घेतली. मात्र जपानी जोडीने 11-6 असा पहिला गेम जिंकत सामना फिरवला. त्यानंतर सलग पुढचे दोन गेमही जिंकून अंतिम फेरी गाठली. हाँगकाँगला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

90 किलोचा खेळाडू 120 किलोच्या महाकायांशी भिडला

सिंगापूरचा कुराशपटू अॅरॉन एनजी साधारणपणे 90 किलोखालील गटात खेळतो. मात्र या स्पर्धेत त्याचा नेहमीचा वजनगटच नसल्याने त्याला 90 किलोवरील गटात उतरावे लागले. सरावासाठी त्याने वजन वाढवण्याच्या दृष्टीने अधिक पाणी पिण्यापासून ते वजनकाटय़ापूर्वी शौचालय टाळण्यापर्यंत मजेशीर उपाय केले. उझबेकिस्तानमध्ये त्याने स्वतःपेक्षा सरासरी 120 किलो वजनाच्या प्रतिस्पर्ध्यांना चकवून रौप्यपदकही जिंकले होते.