वाशिष्ठी पुलाच्या रखडलेल्या कामासाठी नोव्हेंबर अखेरची मुदत, ६ डिसेंबरपासून रस्ता रोकोचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण तालुक्यातील पिंपळी-नांदिवसे मार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूल कोसळून वर्षभराचा कालावधी उलटत आला तरी नव्या पुलाचे काम अपेक्षित वेगाने पूर्ण होत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पुलावर अवलंबून असलेल्या सुमारे १४ ते १५ गावांतील नागरिक, विद्यार्थी, कामगार तसेच एमआयडीसी परिसरातील वाहतूक गेल्या वर्षभरापासून मोठ्या अडचणींचा सामना करीत आहे. त्यामुळे पुलाचे काम नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी करण्यात आली असून, निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास ६ डिसेंबर २०२६ पासून पर्यायी मार्गावर लोकशाही व सनदशीर मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांनी प्रशासनाला दिला आहे.

पिंपळी–नांदिवसे मार्गावरील या पुलाची आवश्यकता लक्षात घेऊन सन २००७ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने मागणी करण्यात येत असल्याचे अडरेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. सन २०१७ आणि २०२२ मध्ये आलेल्या महापुराच्या काळात पुलावर सुमारे १५ फूट पाणी गेले होते. या पुरामुळे पुलाचे रेलिंग तसेच पाईपलाईनचे नुकसान झाले होते. परिणामी परिसरातील विविध गावांच्या संपर्कासह एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला होता. पुलाची स्थिती दिवसेंदिवस धोकादायक होत असतानाही त्याबाबत दीर्घकाळ प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू राहिल्याचा मुद्दा नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

सन २०२३ मध्ये या पुलासाठी सुमारे १ कोटी ४८ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यानंतर हे अंदाजपत्रक सुमारे १ कोटी ९८ लाख रुपयांपर्यंत सुधारित करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. निधी, प्रशासकीय मान्यता आणि संबंधित विभागांमधील प्रक्रिया यामुळे पुलाच्या कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊनही कामाची प्रगती अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने नागरिकांच्या अडचणी कायम आहेत.

दरम्यान, २३ ऑगस्ट २०२५ रोजी नागरिक पुलावर उपस्थित असताना एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये पुलाची मालकी व हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू होती. याच वेळी हा पूल अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत नागरिक थोडक्यात बचावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पूल कोसळल्यानंतर परिसरातील सुमारे १४ ते १५ गावांचा थेट संपर्क, एमआयडीसीतील दळणवळण तसेच कामगार आणि विद्यार्थ्यांची दररोजची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

पूल बंद झाल्यानंतर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला असला तरी हा मार्ग अरुंद असून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सक्षम नसल्याने त्याचीही गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात या मार्गावरून वाहतूक करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नवीन पूल वाहतुकीस खुला होईपर्यंत पर्यायी मार्गाचे तातडीने मजबुतीकरण, आवश्यक रुंदीकरण आणि डांबरीकरण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पुलाच्या कामास झालेल्या विलंबाबाबत प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुलाच्या सद्यस्थितीपासून ते सुधारित अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष कामाची प्रगती आणि काम पूर्ण होण्याची निश्चित तारीख याबाबत संबंधित विभागांनी पारदर्शक माहिती द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. वर्षभरापासून नागरिक प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असताना आता विद्यार्थ्यांचे शिक्षण, कामगारांची रोजची ये-जा, गावांचा संपर्क आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होत चालल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण झाले नाही आणि पर्यायी मार्गाची आवश्यक दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात आले नाही, तर ६ डिसेंबर २०२६ पासून संबंधित पर्यायी मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अडरेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रत्नागिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी, एमआयडीसी प्रशासन तसेच उद्योग विभागाकडे निवेदन व पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन पुलाच्या कामाला किती गती देते आणि नागरिकांच्या या मागणीवर कोणती ठोस कार्यवाही केली जाते, याकडे पिंपळी–नांदिवसेसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.