
पावसाळा संपत असताना हवेत गारवा वाढू लागला आहे. तापमानातील बदलांमुळे सर्दी, खोकला, घशात खवखव आणि ताप यांसारख्या आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. विशेषतः सकाळी उठल्यानंतर घसा कोरडा पडणे, खवखव होणे किंवा खोकला येणे अशा तक्रारी अनेकांना जाणवत आहेत. बदलत्या हवामानाचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो आणि या समस्यांपासून बचाव कसा करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
सप्टेंबर हा पावसाळ्याचा शेवटचा महिना असून, हळूहळू थंडीच्या दिवसांकडे वाटचाल सुरू झाली आहे. कधी कडक ऊन, तर कधी अचानक ढगाळ वातावरण आणि जोरदार वारे, तर कधी पावसामुळे हवेत वाढणारा ओलावा अशा बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बदलत्या हवामानात तापमान आणि हवेतील आर्द्रतेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे शरीरातील कफ आणि वात यांचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे सकाळी घसा कोरडा पडणे, घशात खवखव होणे किंवा खोकला येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
रात्री झोपताना तोंडाने श्वास घेणे किंवा खोलीतील हवा कोरडी असणे यामुळेही घशाचा कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे खोलीचे तापमान योग्य ठेवावे आणि शक्यतो नाकानेच श्वास घेण्याची सवय लावावी.
बदलत्या हवामानात घशात खवखव होणे किंवा घसा कोरडा पडणे यांसारखी सौम्य लक्षणे जाणवत असल्यास पुरेसे कोमट पाणी प्यावे. सकाळी उठल्यानंतर वाफ घेतल्यानेही आराम मिळू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी वाफ घेतल्याने कफ कमी होण्यास मदत होऊ शकते आणि झोपही चांगली लागण्यास मदत होते. खोकला सतत सुरू राहिल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा तापासारखी लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. योग्य उपचार मिळण्यासाठी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी लहान मुलांपासून अंतर ठेवावे. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती तुलनेने कमी असल्याने विषाणूजन्य संसर्ग त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.
बदलत्या हवामानात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. घरात तयार केलेले ताजे, हलके आणि सहज पचणारे अन्न खावे. या काळात पचनक्रिया मंदावू शकते. बाहेरील पदार्थ, विशेषतः जंक फूड, जास्त चरबीयुक्त पदार्थ आणि पॅकबंद अन्न टाळावे. आहारात आले, लसूण, जिरे, ओवा आणि हळद यांचा समावेश करावा. दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. शक्यतो साधे किंवा कोमट पाणी प्यावे.




























































