
हिंदुस्थानी प्रवाशांसाठी प्रीमियम प्रवासाचा अर्थ आता केवळ मोठी सीट किंवा चांगले जेवण एवढाच राहिलेला नाही. विमानतळावर कमी वेळ थांबावे लागणे, पुरेशी जागा मिळणे आणि प्रवासादरम्यान प्रत्येक छोट्या गोष्टीकडे वैयक्तिक लक्ष दिले जाणे, अशा सुविधांना प्रवासी अधिक महत्त्व देत आहेत. विमानतळाच्या टर्मिनलपासून ते विमानाच्या केबिनपर्यंत प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी आणि सोयीस्कर असावा, अशी अपेक्षा वाढत आहे.
प्रवास करताना पर्यटकांना जास्तीत जास्त वेळ आपल्या सहलीचा आनंद घेण्यात घालवायचा असतो. प्रवासातील धावपळ आणि गैरसोयींमुळे अनेकदा पर्यटनस्थळी पोहोचल्यानंतर थकवा आणि चिडचिड जाणवते. त्यामुळे आता प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी करण्यावर भर दिला जात आहे. सुट्टीच्या प्रवासाची सुरुवात विमानतळावरील रांगेत उभे राहून व्हावी, असे कोणालाही वाटत नाही. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने विमानतळावरील प्रक्रिया सुलभ असणे आणि टर्मिनलमध्ये सहजपणे फिरता येणे, या गोष्टी प्रीमियम प्रवासाचा महत्त्वाचा भाग बनत आहेत. विमानतळाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे. विमानतळ हे केवळ रस्ता आणि विमान यांना जोडणारे ठिकाण राहिलेले नाही. लाउंज, खरेदी, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाच्या सुविधा यांमुळे विमानतळावरील वेळही प्रवासाच्या अनुभवाचा भाग बनत आहे.
प्रीमियम सेवा आता केवळ औपचारिक न राहता अधिक वैयक्तिक होत आहे. प्रवासातील सुविधांचे महत्त्व केवळ महागड्या प्रवासापुरते मर्यादित राहिलेले नाही. प्रवासी खर्च करताना सावध असले, तरी आराम, विश्वासार्हता, स्वच्छता, संपर्क सुविधा आणि सोयी यांना आता अतिरिक्त सुविधा न मानता आवश्यक बाबी मानले जात आहे.



























































