दिल्लीतील बेला इस्टेटमधील ७२८ पैकी ७२७ मतदारांची नावे वगळली, हा तर मतचोरीचा प्रकार; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील बेला इस्टेट भागातील मतदार यादीतून शेकडो मतदारांची नावे वगळल्याप्रकरणी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ७२८ पैकी तब्बल ७२७ लोकांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप करत, हा सर्व प्रकार म्हणजे मतचोरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

यमुना नदीच्या काठी असलेल्या बेला इस्टेट भागाला राहुल गांधी यांनी सोमवारी भेट दिली. यासंदर्भात X वर पोस्ट करत ते म्हणाले, “बेला इस्टेटमध्ये ७२८ लोक राहतात. मात्र एसआयआर प्रक्रियेनंतर आता मतदार यादीत केवळ एकाच व्यक्तीचे नाव उरले आहे, उर्वरित ७२७ जणांची नावे वगळण्यात आली आहेत. हे नागरिक इथे कित्येक दशकांपासून राहत आहेत. त्यांनी २०२४ च्या लोकसभा आणि २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही मतदान केले होते. २०२३ मध्ये त्यांची घरे पाडण्यात आली, पण ते कुठेही गेले नाहीत, ते अजूनही तिथेच राहत आहेत.”

‘घर नसणे आणि मतदानाचा हक्क यांचा संबंध नाही’

स्थानिक रहिवाशांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, “मी आज त्यांच्या झोपड्यांमध्ये गेलो आणि निवडणूक आयोगाने त्यांच्यासोबत काय केले आहे, हे प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकले. मी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांशी फोनवर बोललो आणि त्यांना स्पष्ट सांगितले की, स्वतःचे घर असणे किंवा नसणे याचा मतदानाच्या हक्काशी कोणताही संबंध नाही. खुद्द मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनीच सांगितले होते की हाऊस नंबर ० हे बेघरांसाठी असते. तरीही ७२७ लोकांची नावे वगळली गेली. ही प्रक्रीया म्हणजे दुसरी-तिसरी काही नसून मतचोरीची पद्धत आहे.”