
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी क्रीडा विश्वाला चकित करणारी घटना घडली. कझाकस्तानची 21 वर्षीय यास्मिना तोक्सानबायेवा महिलांच्या 42.195 किलोमीटरच्या मॅरेथॉन रेस वॉकमध्ये सर्वांत आधी अंतिम रेषेवर पोहोचली. 3 तास 22 मिनिटे 20 सेपंदांचा वेळ नोंदवत तिने प्रतिस्पर्ध्यांवर जवळपास चार मिनिटांची आघाडी घेतली आणि कझाकस्तानला या प्रकारातील पहिले आशियाई सुवर्ण मिळवून दिले होते. मात्र तिचे बूट नियमबाह्य असल्याची तक्रार केल्यामुळे रविवारी जिंकलेले सुवर्ण सोमवारी तिच्याकडून हिरावून घेण्यात आले.
रविवारी फिनिशिंग लाइन ओलांडल्यानंतर कझाकच्या सहकाऱयांनी जल्लोष केला होता. त्यांच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर पडली. मात्र काही वेळातच या आनंदाला अनपेक्षित वळण मिळाले. स्पर्धा अधिकाऱयांकडे तोक्सानबायेवाने वापरलेल्या स्पोर्ट्स शूजविषयी आक्षेप नोंदवण्यात आला. कझाकस्तानच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सांगितले की, तिच्या बुटांचा मॉडेल वर्ल्ड अॅथलेटिकच्या परवानगी असलेल्या यादीत आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर तिचा निकाल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकृत नोंदीत तिच्यावर उपकरणासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे काही तासांपूर्वी सुवर्णपदक जिंकून आनंद साजरा करणारी तोक्सानबायेवा अचानक निकालातूनच बाहेर पडली.























































