
बॉक्सिंगमध्ये हिंदुस्थानसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन उपांत्य फेरीत पोहोचली आहे. तिने दक्षिण कोरियन बॉक्सर सूयॉन सेओंगचा 5-0 असा पराभव केला. लव्हलिनाने प्रत्येक फेरी जिंकून हिंदुस्थानसाठी एक पदकही निश्चित केले आहे, मात्र तिच्याकडून चाहत्यांना सुवर्णपदकाची अपेक्षा असेल.
तिरंदाजी संघाची विजयी मालिका कायम
हिंदुस्थानी तिरंदाजी संघाने स्पर्धेची सुरुवात दमदार कामगिरीने झाली. साहिल जाधवने पुरुषांच्या कंपाऊंड एलिमिनेशन फेरीत मंगोलियाच्या जामियांगोम्बो पुरेवदोर्जचा 149-137 असा पराभव केला. साहिल आशियाई खेळांमधील विक्रमाची बरोबरी करण्यापासून केवळ एका गुणाने चुकला. थिरुमुरू मणिरत्नमने पुरुषांच्या कंपाऊंड एलिमिनेशन फेरीत इंडोनेशियाच्या सोस्टार अंदारू रिनाल्डीचा 144-142 असा पराभव केला. ही एक चुरशीची लढत होती, पण गणेशने दबावाखाली चांगली कामगिरी करत विजय मिळवला आणि स्पर्धेत पुढील फेरीत प्रवेश केला.
तिरंदाजीत मणिरत्नमने साहिलला हरवले
साहिल राजेश जाधव आणि मणिरत्नम गणेश यांच्यातील अखिल हिंदुस्थानी स्पर्धा अत्यंत रोमांचक होती. दोन्ही तिरंदाजांमध्ये अटीतटीची लढत झाली, पण मणिरत्नमने बाजी मारली. त्याने साहिलचा 149-148 असा पराभव केला. या विजयासह मणिरत्नमने पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता तो पदकासाठीचा आपला प्रवास सुरू करेल.
सर्फिंगमध्ये किशोर कुमारची उपांत्यपूर्व फेरीत एंट्री
हिंदुस्थानच्या किशोर कुमारने पुरुषांच्या शॉर्टबोर्ड प्रकारातील तिसऱया फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या हिंदुस्थानी खेळाडूने चीनच्या मा वेनसॉन्गचा 9.76-8.80 अशा चुरशीच्या लढतीत पराभव केला. या विजयासह किशोरने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र हिंदुस्थानचा शिवराज बाबू तिसऱया फेरीच्या हीटमध्ये पराभूत झाल्याने दिवसाच्या सुरुवातीलाच स्पर्धेतून बाहेर पडला.
व्हॉलीबॉलमध्ये हिंदुस्थानची हाँगकाँगवर मात
हिंदुस्थानने पुरुषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ‘क’ गटामध्ये आपला सलग दुसरा विजय नोंदवला. टीम इंडियाने हाँगकाँगचा 25-22, 25-19, 25-21 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत सामना जिंकला. कर्णधार जेरोम विनीतने उत्कृष्ट कामगिरी करत संघाचे नेतृत्व केले. जॉन जोसेफ, अश्वल राय आणि चिराग यादव यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. या विभागामध्ये हिंदुस्थानचा हा सलग दुसरा विजय आहे. टीम इंडिया आता उद्या कतारचा सामना करेल. गटातील अव्वल स्थानासाठी हा सामना महत्त्वाचा मानला जातो.
स्क्वॉशमध्ये महिलांचा चीनवर दमदार विजय
हिंदुस्थानने आपल्या महिला स्क्वॉश सांघिक मोहिमेची सुरुवात विजयाने केली. त्यांनी गटातील सामन्यात चीनला 2-1 ने पराभूत केले. शमिना रियाझने पहिले दोन गेम जिंकले, पण तिला सामना जिंकता आला नाही आणि एका रोमांचक लढतीत ती 2-3 ने हरली. स्कोअर 11-8, 11-6, 9-11, 9-11, 14-12 असा होता. त्यानंतर तन्वी खन्नाने शानदार कामगिरी करत हिंदुस्थानला पुनरागमन करून दिले आणि झांग युनिंगला सरळ तीन गेममध्ये 3-0 ने पराभूत केले. तन्वीने हा सामना 11-3, 11-5, 11-5 असा जिंकला. सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर हिंदुस्थानचा विजय निश्चित करण्याची जबाबदारी अनुभवी जोशना चिनप्पावर होती. तिने लिऊ जियायीला 3-0 ने पराभूत करून हिंदुस्थानला विजय मिळवून दिला. जोशनाने हा सामना 12-10, 11-4, 11-6 असा जिंकला.
पावसामुळे क्रिकेट सामना रद्द; हिंदुस्थान उपांत्य फेरीत
नागोयामध्ये पुन्हा एकदा पावसाने विजय मिळवला. हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामन्याच्या अगदी आधी पावसाने थोडा दिलासा दिला आणि दोन्ही संघांचे खेळाडू कव्हर असूनही मैदानावर उतरले. मात्र पुन्हा पाऊस परतल्याने अधिकाऱयांना सामना रद्द करावा लागला. अफगाणिस्तानपेक्षा सरस असलेल्या आयसीसी टी–20 क्रमवारीमुळे हिंदुस्थानने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
चिकिता उपांत्यपूर्व फेरीत, पण ज्योती बाहेर,
तिरंदाजीत हिंदुस्थानच्या ज्योती सुरेखा वेन्नमचा महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेतील प्रवास संपला आहे. तिला 14 वर्षीय कोरियन खेळाडू कांग येओनसेओने पराभूत केले. कांगने उत्कृष्ट कामगिरी करत अचूक 150 गुण मिळवले, तर ज्योतीला केवळ 146 गुण मिळवता आले. यामुळे हिंदुस्थान तिरंदाजाला चुकीला वावच उरला नाही. दरम्यान, चिकिता तनिपार्थीने चायनीज तैपेईच्या चेन यी-हुआनला एका रोमांचक शूट ऑफमध्ये पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 15 नियमित शॉट्सनंतर दोन्ही तिरंदाज 148-148 अशा बरोबरीत होत्या, ज्यामुळे टाय-ब्रेकर घेण्यात आला. शूट ऑफमध्ये दबावाखाली असलेल्या चिकिताने एका उत्कृष्ट शॉटने अचूक लक्ष्यभेद केला. चेननेही 10 गुण मिळवले, पण तिचा बाण किंचित लक्ष्यापासून दूर गेला अन् चिकिताने विजय निश्चित केला.























































