
विकासकांची मनमानी आणि ठाणे महानगरपालिकेचे ढिसाळ नियोजन यामुळे शहरातील विविध ठिकाणी सुरू झालेले एसआरए प्रकल्प हे अपयशी ठरले. त्यामुळे हे प्रकल्प बंद पडले. हक्काच्या घरासाठी हजारो ठाणेकर अजूनही वाट पाहात आहेत. अशा परिस्थितीत क्लस्टर कसे राबवणार, असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रशासनाला केला आहे.
ठाण्यातील लोकमान्यनगर भागात क्लस्टर योजना राबवण्याबाबत शिंदे गटाचे नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी स्थानिकांसोबत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी घेतली होती. यासंदर्भात संताप व्यक्त करताना केदार दिघे यांनी सांगितले की, ज्या ठाणे महापालिकेला आजपर्यंत बंद पडलेल्या एसआरए प्रकल्पांवर ठोस तोडगा काढता आलेला नाही ते क्लस्टर योजना सुरक्षितपणे कशी काय राबवणार? सामान्य ठाणेकरांनी पालिकेवर विश्वास ठेवायचा तरी कसा, असा सवालही त्यांनी केला.
विकासक दिवाळखोरीत निघाला तर जबाबदार कोण?
क्लस्टर योजनेसाठी नेमल्या जाणाऱ्या विकासकाची आर्थिक पात्रता काय आहे, हे आधी तपासणी गरजेचे आहे. एकाच वेळी अनेक प्रकल्पांमध्ये हात घालून एखादा विकासक दिवाळखोरीत निघाला तर लोकांच्या हक्काच्या घरांचे काय होणार, रहिवाशांचे नुकसान झाल्यास महापालिका स्वतःची बँक गॅरंटी देऊन घरांची जबाबदारी स्वीकारणार का, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती केदार दिघे यांनी केली.
पाणी, रस्ते, कचरा, पार्किंगचा बोजवारा उडणार
क्लस्टरच्या अतिरिक्त घरांमुळे शहरातील लोकसंख्या आणखी वाढेल. आजच ठाणेकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, मग या अतिरिक्त लाखो नागरिकांसाठी पाणी कुठून आणणार, कचरा व्यवस्थापन कसे करणार, या हायराईज इमारतींमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांना पुरेशी पार्किंग व्यवस्था मोफत मिळणार का, अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.



























































