
दहिसर पश्चिम येथे एका शाळेच्या आवारात कृत्रिम तलावासाठी 14 फुटांचा खोल खड्डा खोदण्यात आला आहे. शाळेची पूर्वपरवानगी किंवा पूर्वकल्पना न देता हे खोदकाम का करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या विषयाचे पडसाद आज शिक्षण समितीत उमटले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरे मार्ग, मुंबई पब्लिक स्कूल, दहिसर पश्चिम (आर उत्तर प्रभाग क्रमांक 7) या शाळेला लागूनच 100 मीटरच्या आत विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आला. या शाळेत सुमारे 2500 मुले शिकतात. विशेष म्हणजे अवघ्या 300 मीटर अंतरावर आधीच तलाव उपलब्ध असताना शाळेच्या जागेची निवड करण्यात आली. यासंदर्भातील हरकतीचा मुद्दा शिक्षण समिती सदस्य प्रियांक राऊत यांनी आज उपस्थित केला. शाळेने पूर्वपरवानगी किंवा पूर्वकल्पना न देता हे खोदकाम केले होते, असा आरोप प्रियांक राऊत यांनी केला. गणेशोत्सवाच्या बारा दिवसांच्या काळात अवघ्या 100 मूर्तींचे विसर्जन या तलावात झाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दहिसर परिसरात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध मैदाने असताना विद्यार्थ्यांच्या खेळासाठी वापरल्या जाणाऱया शाळेच्या मैदानाचीच निवड का करण्यात आली, असा सवाल करून या निर्णयाबाबत योग्य ती माहिती व स्पष्टीकरण प्रशासनाकडून मिळण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना उपायुक्त सपकाळे यांनी 100 मीटरच्या आत तलाव बांधला गेला असेल तर चुकीचे आहे. या प्रकरणाची माहिती सहाय्यक आयुक्ताक्ंाैडून मागवून स्पष्टीकरण दिले जाईल, असे सांगितले. या विषयावर स्पष्टीकरण येईपर्यंत हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात येत असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी सांगितले.


























































