कोकणवासीयांच्या संयमाचा अंत पाहू नका, रेल्वे प्रशासनाला शिवसेनेचा इशारा; प्रवासातील समस्यांकडे वेधले लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्यांबाबत शिवसेनेने सोमवारी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेऊन आवाज उठवला. कोकण रेल्वेच्या गाडय़ांना गणेशोत्सव काळात प्रचंड गर्दी होते. ही केवळ सणासुदीतील समस्या नसून वर्षभर कोकणी प्रवाशांना गैरसोयींना तोंड द्यावे लागते. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावीत, कोकणी प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा शिवसेनेने रेल्वे प्रशासनाला दिला.

शिवसेना उपनेते, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभागप्रमुख स्वप्नील शिरकर व इतर पदाधिकाऱयांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कोकणी प्रवाशांच्या समस्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले. कोकणाकडे जाणाऱया गाडय़ांचे आरक्षण मिळविण्यासाठी करावी लागणारी कसरत, जनरल डब्यांमधील प्रचंड गर्दी, दरवाजे व टॉयलेट परिसरातील गैरसोय, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, स्वच्छतागृहांची दुरवस्था, खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण होणारे प्रश्न तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघाल्यानंतर ठाणे येथे अचानक होणाऱ्या प्लॅटफॉर्म बदलामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि मोठे सामान घेऊन प्रवास करणाऱ्या कुटुंबांची होणारी धावपळ आदी गंभीर प्रश्न निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. याप्रसंगी रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, शिवसेना उपशाखाप्रमुख विजय कांगोरे, योगेश जाधव आणि भरत शर्मा उपस्थित होते.

कायमस्वरूपी उपाययोजना करा

प्रवासातील समस्या गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून वर्षभराच्या आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना वर्षभर दिलासा मिळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.