देश विदेश – नवजात बालकांना सोन्याची अंगठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी सोमवारी मदुराई येथील राजाजी हॉस्पिटलमध्ये थाईमामन गोल्ड रिंग योजनेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी एका नवजात बालकाला एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घातली. सरकारी रुग्णालयात जास्तीत जास्त प्रसूती व्हावी हा या योजनेमागचा उद्देश आहे. लोकांचा सरकारी आरोग्य सुविधेवर विश्वास वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

नेपाळमध्ये दुर्घटना 4 ठार, 12 बेपत्ता

नेपाळ पुराच्या महासंकटाने अजून सावरलेले नसतानाच आता नेपाळमधील मनांग जिह्यातील हिमलुंग हिमालयात झालेल्या हिमस्खलनाच्या दुर्घटनेत सोमवारी आणखी दोन मृतदेह सापडल्याने दुर्घटनेतील मृतांची संख्या चार वर पोहोचली असून 12 जण अजूनही बेपत्ता आहेत. हिमलुंग हिमालाच्या बेस कॅम्पवर रविवारी अचानक हिमस्खलन झाले होते. ही दुर्घटना 7,126 मीटर उंच नार-फू परिसरात घडली.

बँकाॅकमध्ये महापूर, 8 ठार

थायलंडची राजधानी बँकाॅकमध्ये मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण शहराची ड्रेनेज व्यवस्था कोलमडली असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुरामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 16 सप्टेंबरपासून आतापर्यंत थायलंडमधील 41 प्रांतांना पुराचा फटका बसला आहे. 5.8 लाखांहून अधिक घरांवर परिणाम झाला आहे.  5,901 लोक 234 मदत छावण्यांमध्ये आहेत.

पाकिस्तानात बॉम्बस्फोट 11 ठार

पाकिस्तानच्या पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिह्यातील दराजिंदा परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 30 जण जखमी झाल्याची घटना घडली. या स्पह्टाची जबाबदारी तहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने घेतली आहे. एका सिक्युरिटी चेकपॉइंटवर स्पह्टकांनी लादलेल्या वाहनाने हा हल्ला करण्यात आला. हा परिसर अफगाणिस्तान सीमेला लागून आहे.