
देशातील निवडणुका या ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्या, अशी जोरदार मागणी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी केली. बसपा कार्यालयात त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. बसपाने सुरुवातीपासून ईव्हीएमला विरोध केलेला आहे. मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे, या मागणीसाठी बसपाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. याच अधिकाराच्या माध्यमातून जनता आपल्या पसंतीचे सरकार निवडते. प्रत्येक मतदाराला आपल्या पसंतीच्या उमेदवाराला किंवा पक्षाला मतदान करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले आहे ते मतदान त्याच उमेदवाराला जायला हवे. आपले मत दुसऱयाच्या खात्यात गेले किंवा त्याची मोजणी अन्य कोणाच्या बाजूने झाली, असा संशय मतदाराच्या मनात निर्माण होता कामा नये. असेही मायावती यावेळी म्हणाल्या.


























































