गुजरातमध्ये 1,100 कोटींचा घोटाळा उघड; राजकीय पक्षाकडून देणगीच्या बोगस पावत्या घेऊन टॅक्सचोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गांधीनगरमध्ये राजकीय देणगीच्या आडून सुरू असलेल्या तब्बल 1100 कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. आर्थिक घोटाळा आणि टॅक्स चोरी केल्याप्रकरणी अहमदाबादचे आयकर उपायुक्त डॉ. राजेंद्र राज यांनी स्वतः गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा संपूर्ण घोटाळा एका नोंदणीकृत आणि मान्यता नसलेल्या भारतीय नॅशनल जनता दल (बीएनजेडी) आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आला आहे.

भारतीय नॅशनल जनता दलाने आर्थिक वर्ष 2019-20, 2024-25 या दरम्यान 56 हजारांहून अधिक करदात्यांकडून 1143 कोटी रुपयांची देणगी ‘आरटीजीसी’सारख्या अधिकृत बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून पक्षाच्या खात्यात जमा करून घेतली आहे. या बदल्यात पक्षाने बोगस देणगी पावती त्यांना दिली होती. यामुळे करदात्यांना आयकर अधिनियमच्या नियमांतर्गत 100 टक्के टॅक्स सूट मिळत होती. पक्षाच्या खात्यात देणगीद्वारे आलेला पैसा काजल इंटरप्रायजेस आणि परमार असोसिएट्ससारख्या बनावट कंपन्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात येत होता. हा व्यवहार खरा वाटावा म्हणून धान्य, डाळी आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या खरेदीचे बनावट बिल तयार केले जात होते. यामुळे सरकारला 343 कोटींचे नुकसान झाले.