
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सातत्याने बातम्या येत असतात. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक तर्प लावले गेले. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार अशा चर्चा रंगल्या. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. आम्ही कुणासोबत आणि कुठेही जाणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. त्याच वेळी तुम्हाला यायचं असेल तर आमच्यात विलीन व्हा, असा सूचक संदेशही त्यांनी अजित पवार गटाला दिला.
राज्यातील दुष्काळ, एसआयआर प्रक्रियेतील गडबड या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर आणि दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण तसेच एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर भाष्य केले. मला सांगण्यात आलं, आपल्याबद्दल वेगवेगळय़ा चर्चा आहेत. पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी सांगतो की, होय, चर्चा आहेत. मला त्यांना सांगायचं आहे, आम्ही कुणासोबत आणि कुठेही जाणार नाही. आपण कोणाच्याही जवळ जाणार नाही हा निर्णय पक्का असल्याचे सांगत, मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या सर्व चर्चा शरद पवार यांनी फेटाळून लावल्या.
निवडणुकीत एआयचा धोका
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपयोग अनेक प्रश्न सोडवण्यासाठी होत आहे, पण त्याचे धोकेही मोठे आहेत. मला काळजी ही आहे की, ही कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने तुमच्या निवडणुकीचे निकाल कसे फिरवायचे यासाठीही वापरली जाईल. अमेरिका, युरोपमध्ये याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर राजकारण, निवडणूक आणि पक्ष बांधण्यासाठी कसा करता येईल याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे, असे शरद पवार म्हणाले.
उत्तर काळाच्या ओघातच मिळेल – तटकरे
शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून देशाचे नेतृत्व करतात. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ अनेकदा कळतही नाही. अनेक प्रसंगी त्यांनी साधलेले टायमिंग अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या विशिष्ट वेळी हे विधान करण्यामागचा त्यांचा नेमका काय हेतू असू शकतो हे या क्षणी सांगणे कठीण आहे. त्यांच्या वक्तव्याचे उत्तर काळाच्या ओघातच मिळेल, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.


























































