मतदार याद्यांची तपासणी आणि नवीन नोंदणीबाबत सजग रहा, आंबेसरी येथील बैठकीत शिवसैनिकांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत सर्व विधानसभा मतदार संघात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या पडताळणीदरम्यान मतदार याद्यांची तपासणी आणि नवीन नोंदणीबाबत शिवसैनिकांनी सजग राहून देखरेख करावी, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विलास पोतनीस आणि पालघर लोकसभा यंत्रणाप्रमुख अमोल कीर्तिकर यांनी केले. एसआयआर संदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आंबेसरी येथे पक्षाची बैठक घेण्यात आली होते. यावेळी त्यांनी संघटनात्मक बांधणीबाबतही मार्गदर्शन केले.

बोईसर, पालघर आणि डहाणू विधानसभा मतदार संघातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत एसआयआर अंतर्गत मतदार याद्यांची तपासणी व पडताळणी, नवीन मतदारांची नोंदणी तसेच संबंधित कामकाजाबाबत पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विलास पोतनीस, पालघर लोकसभा यंत्रणाप्रमुख अमोल कीर्तिकर आणि मुंबई सिनेट सदस्य मिलिंद साटम सविस्तर यांनी मार्गदर्शन केले.

आगामी निवडणुका, संघटनात्मक बांधणी, स्थानिक पातळीवरील कामकाज आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी स्थानिक प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यात आल्या. बैठकीला पालघर जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, आंबेसरीच्या सरपंच गीता मोरघा, चरी-कोटबीच्या सरपंच वसुंधरा वायदा, प्रकाश मेरे, डहाणू तालुकाप्रमुख संजय पाटील उपस्थित होते.