
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या दर्जावर सातत्याने टीका केली जात असून सोमवारी शिक्षण समितीच्या सभेतही यावरून वातावरण तापले. महापालिकेच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असून ते अन्न बनविण्याची जागादेखील (किचन) अस्वच्छ असल्याचे आरोप शिक्षण समिती सदस्यांनी केले. या किचनची नियमित पाहणी करावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली.
शिक्षण समितीच्या बैठकीत शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी मध्यान्ह भोजनाच्या दर्जाबाबत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित केले. अंकित प्रभू म्हणाले, महापालिकेच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनाचा दर्जा तपासण्याची तसदी पालिकेकडून घेतली जात नाही. ज्याठिकाणी भोजन बनविले जाते त्या किचनची अवस्थाही बिकट असते, असे ते म्हणाले. प्रभू यांच्या हरकतीच्या मुद्दय़ाला शिवसेना नगरसेवक प्रमोद सावंत यांनी पाठिंबा देत मध्यान्ह भोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर प्रशासनाच्या वतीने उत्तर देताना मध्यान्ह भोजनाचा दर्जा आणि किचनच्या स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने पाच पर्यवेक्षकांची नेमणूक केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर प्रमोद सावंत यांनी त्याचे खंडन केले.
अनेक ठिकाणी किचन फक्त कागदावर
गेल्या अनेक वर्षांपासून परिस्थिती जैसे थे आहे. शिक्षण समितीच्या सभेत दरवर्षी माध्यान्ह भोजनाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जातात, मात्र अद्याप अपेक्षित बदल जाणवले नाहीत. शिक्षणाधिकाऱ्यांनी या विषयात जातीने लक्ष घालावे, असे निर्देश समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी दिले. काही ठिकाणी अन्न सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे नगरसेवकांनी सुचवलेले बदल अमलात आणावेत. पुढील बैठकीत पालिकेने याबाबत एसओपी तयार करून आणावी, असे आदेशही त्यांनी दिले.



























































