
निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि सरकारधार्जिण्या कारभाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. देशातील मतचोरीस जबाबदार असलेले ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आज महाराष्ट्रासह देशभरात मोर्चे काढले. ठिकठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून मोदी सरकारसह निवडणूक आयोगाचा जोरदार निषेध केला.
महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, उत्तराखंड, राजस्थान अशा सर्वच राज्यांत काँग्रेस कार्यकर्ते सलग दुसऱया दिवशी रस्त्यावर उतरले. ज्ञानेश कुमार आणि पेंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यात आघाडीवर होते. महाराष्ट्रात अमरावती, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूरमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले. कुठे ज्ञानेश यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली, कुठे हात जोडून माफी मागायला लावली तर कुठे उठाबशा काढायला लावल्या. ज्ञानेश कुमार यांना तत्काळ बडतर्फ करून त्यांना अटक करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे देण्यात आली.
घरावर लिहिले ’गद्दार’
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या घराबाहेर निदर्शने केली. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच, प्रवेशद्वारावर व भिंतींवर ’ज्ञानेश गद्दार’, ’वोट चोर’, ’ज्ञानेश कुमार चोर’ असे लिहिण्यात आले.
लोकशाहीसाठी घातक माणूस
ज्ञानेशकुमार यांच्या भ्रष्ट कारभारामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. एसआयआरच्या माध्यमातून 13 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. हा माणूस पदावर राहणे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यांना पदावरून हटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरू राहील, असा इशारा काँग्रेसने दिला. देशभर झालेल्या एल्गार मोर्चात पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार, खासदारांसह सर्व पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

























































